पोलीस आजोबांचा आदर्श घेत वृशाली कांबळेने केली युपीएससी सर

0
273

नोकरीसाठी वडिलोपार्जित घर आणि गाव सोडावं लागलं, पोटच्या दोन लेकींना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी जीवाची मुंबई करणाऱ्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तुरच्या संतराम कांबळे यांच्या लाडक्या लेकीनं जिद्द आणि सातत्याच्या बळावर यशाला गवसणी घातलीय. कोल्हापूरच्या गडहिंग्लज, आजरा, चंदगड भागातील पहिली महिला आयएएस होण्याचा मान वृषाली कांबळेनं मिळवला. देशातून वृषाली 310 व्या रँकनं यूपीएससी उत्तीर्ण झाली आहे.

आजोबांकडून घेतली प्रेरणा : सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन मुंबईसारख्या शहरात चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी 90 च्या दशकात कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तुर गाव संतराम यांनी सोडून नवी मुंबईतील नेरूळ येथे स्थायिक झाले. कर्नाटकातील पोलीस दलात असणारे तिचे आजोबा निवृत्त पोलीस उपअधीक्षक गिरीश कांबळे यांच्याकडून प्रेरणा घेऊन वृषालीनं अगदी दहावीपासूनच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करण्याला सुरुवात केली होती. नवी मुंबईतील सेंट ऑगस्टीन शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन एसआयएस कॉलेजमधून महाविद्यालयीन तर सेंट झेवियर महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयात पदवी संपादन केली. आता ती यूपीएससीतून जिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे.

बार्टीमधून निवड आणि यशाला गवसणी : 2020 वर्षीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याला सुरुवात केली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्था बार्टीमध्ये 2023 मध्ये स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी वृषाली कांबळेची निवड झाली. यानंतर संस्थेच्या माध्यमातून दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व मुख्य आणि मुलाखतीसाठी तिनं प्रशिक्षण घेतलं. याच प्रशिक्षणाचा तिला सर्वाधिक फायदा झाला. दररोजचा 10 तास अभ्यास, वर्तमानपत्रांचं आकलन आणि झालेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा सराव यामुळं कमी कालावधीत यशापर्यंत पोहोचण्याचा खडतर प्रवास वृषाली कांबळेनं केला. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढतोय ही सकारात्मक गोष्ट आहे. राज्यातील तरुणाईने स्वतःचा आत्मविश्वास वाढवून कष्ट केल्यास नक्कीच राज्यातील अनेक मुला-मुलींना प्रशासनात येण्याची संधी असल्याचं वृषाली सांगते.