पवार कुटुंबाचे राजकीय भांडण हा इलेक्शन जुमलाच , सुप्रिया सुळे यांनी घेतले सुनेत्रा पवार यांच्याकडून ५५ लाख हातउसणे

0
179

बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजयी अशी लढत बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता पवार कुटुंबातील दोन महिला या निवडणुकीच्या मैदानात समोरासमोर आल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटाकडून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत. दोन्ही गटांकडून आपापल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरु आहे. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात आलं. या सर्व घडामोडींदरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याकडून 55 लाख रुपये उसणे घेतले आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर भावजय आणि भाच्याचं एकूण 55 लाखांचं कर्ज आहे, अशी माहिती समोर येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आता उमेदवारी अर्ज भरताना नियम कडक केले आहेत. निवडणुकीसाठी आता अर्ज भरताना उमेदवाराची काही वैयक्तिक माहिती देखील विचारण्यात येते. यामध्ये उमेदवाराची एकूण संपत्ती किती, उत्पन्न किती आणि कर्ज किती, याबाबतची माहिती विचारली जाते. तसेच उमेदवारांच्या कुटुंबियांच्या नावावर किती संपत्ती आहे, याची देखील माहिती प्रतिज्ञापत्रावर द्यावी लागते. सुप्रिया सुळे यांनी आज अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात सुप्रिया सुळे यांनी आपल्यावर 55 लाखांचं कर्ज असल्याचं सांगितलं आहे.

सुळेंची मालमत्ता १४२ कोटींची –
आपण वहिनी सुनेत्रा पवार आणि भाचा पार्थ पवार यांच्याकडून एकूण 55 लाखांचं कर्ज घेतल्याची माहिती सुप्रिया सुळे यांच्याकडून प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याकडून 22 लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे. तर सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही बँकेचं कर्ज सुप्रिया सुळे यांनी घेतलेलं नाही. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे या 142 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत, अशी देखील माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याला यंदा शेतीतून शून्य उत्पन्न मिळाल्याचं देखील नमूद केलं आहे.