भूखंड घोटाळा, दाऊदशी कुणाचे नाव जोडले ? – अजित पवार यांची काका शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका

0
140

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मूळ पवार आणि बाहेरचे पवार यांच्यात फरक असतो, अशा शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. “40 वर्षात सून येऊन देखील तिला परकी मानली. महिलांनी याचा विचार करायला हवा. वडीलधाऱ्या लोकांनी असं बोलल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते”, असं अजित पवार म्हणाले.” बारामतीच्या विद्यमान खासदारांचं गेल्या 10 वर्षातलं दिसेल असं एक काम सांगा. मी केलेली कामे जाहीरनाम्यात टाकली. त्यांचा जाहीरनामा पाहिल्यावर मीच केलेली कामे दिसली”, अशी टीका अजित पवारांनी केली. “माझे विचार सर्वांना पटले नसतील. पण ही लोकशाही आहे. मी कामाचा माणूस आहे”, असा दावा अजित पवारांनी केला.

“विरोधक आरोप करतात. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप मंत्री झाल्यावर होतात. कामे नाही केली तर कसे आरोप होतील? भूखंड घोटाळा, दाऊदशी कुणाचे नाव जोडले? हे आरोप कुणावर झाले? त्यात सत्य नव्हते. पण आरोप झाले ना?”, अशा शब्दांत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. “कितीही कामे केल्यावर माझ्याबरोबर राहत नाही म्हटल्यावर काय केल्यावर राहतील ते देखील करू. काहीजणांनी 50 वर्षे काम केलं. आता त्यांनी म्हंटल पाहिजे, आम्हाला काम आता करूद्या. माझ्या आता ओळखी झाल्या आहेत. मी अर्थमंत्री आहे आणि राज्याचा 6 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडत आहे”, असं अजित पवार म्हणाले. “एवढ्या वेळ म्हणतील, मत द्या. किती वेळ द्यायचं? एकदा सांगा”, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.

अजित पवारांची बारामतीकरांना साद
“खासदार राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकत नाही”, असं अजित पवार म्हणाले. तसेच “मौलाना आझाद मंडळाला 1 हजार अर्थसंकल्पात तरतूद केली. आजपर्यंत कुणीही ही बाब केली नाही. बारामतीसारखं इतर तालुक्यात काम केलं तर ते मला बिनविरोध लोक निवडून देतील. बारामतीमध्ये कायदा-सुव्यवस्था सगळ्या बाबी चांगल्या आहेत. सहकार क्षेत्रातील सर्व ठिकाणी माझे बारकाईने लक्ष आहे. मला आजपर्यंत साथ दिली तशी आता भावनिक न होता साथ द्यावी”, अशी साद अजित पवारांनी बारामतीकरांना घातली.

“माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझी जास्त ओळख नव्हती. कामाला सुरुवात केली आणि मला उद्धवजी यांनी मुभा दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक गट घेऊन जाईपर्यंत मी विश्वासाने काम केलं. काहीजण भेटायला येतील. डोळ्यांत पाणी आणतील. एवढ्या वेळेस म्हणतील. पण आता माझंच ऐका एवढ्या वेळेस मी हात जोडून सांगतो”, असं आवाहन अजित पवारांनी केलं.