शिल्पा शेट्टी, राज कुंद्राची ९८ कोटींचा मालमत्ता जप्त

0
162

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. एकूण ९८ कोटींची ही मालमत्ता आहे. त्यांचा बंगला आणि ईक्विटी शेअर ईडीने जप्त केले आहेत. आज सकाळीच ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरून गेलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राज कुंद्रा याच्यावर कारवाई केली आहे. जुहूमधील शिल्पा शेट्टी यांच्या नावे असलेला फ्लॅट, पुण्यातील बंगला तसेच इक्विटी शेअर्सही ईडीकडून जप्त करण्यात आला आहे.

लोकांना गुंतवणुकीच्या बदल्यात १० टक्के परतावा दर महिन्याला देण्याचे अमिष दाखवून मोठा बिटकॉइन घोटाळा केल्याचा आरोप राज कुंद्रावर लावण्यात आला आहे. बिटकॉइन प्रकरणात फायदा करवून घेऊन राज कुंद्रा सध्याच्या घडीला १५० कोटींच्या फायद्यात असल्याचेही ईडीचे म्हणणे आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचं नाव बिटकॉईन घोटाळ्यात आलं होतं. हा जवळपास दोन हजार कोटींचा घोटाळा असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात 2018मध्ये दोघांनाही ईडीने समन्स बजावलं होतं. त्यांची चौकशीही झाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज याला तेव्हा अटक करण्यात आली होती. हा घोटाळा मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असल्याचंही सांगितलं जात होता. gatbitcoin.com नावाच्या संकेतस्थळावरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. ही केस कुंद्रा यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळेच त्यांची चौकशी करण्यात आली होती. कुंद्रा या प्रकरणात दोषी आहेत की इन्व्हेस्टर आहेत हे स्पष्ट झालं नव्हतं.

यापूर्वी राज कुंद्रा यांचं नाव आयपीएलच्या सट्टेबाजीतही आलं होतं. शिल्पा आणि कुंद्रा हे आयपीएलची टीम राजस्थान रॉयल्सचे सह मालक होते. या प्रकरणात राज कुंद्रा यांची चौकशी झाली होती. त्यावेळी त्यांनी फिक्सिंगचा गुन्हा कबुल केला होता. त्यानंतर राजस्थानवर दोन वर्षाचा बॅन लावण्यात आला होता. पोर्नोग्राफी प्रकरणामुळे २०२१ साली राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप राज कुंद्रा याच्यावर होता, त्यानंतर त्याला शिक्षा झाली आणि तुरूंगातही जावे लागले.