अपयशाने खचून जायचे नाही… – पंतप्रधान नरेंद्र मोदीं

0
194

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अर्थात UPSC चे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांमध्ये आदित्य श्रीवास्तव देशात पहिला तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. यंदा युपीएससीच्या निकालात दोन मुलांनी उत्तम कामगिरी करत बाजी मारली आहे. मात्र अनेक मुलं अशीही आहेत ज्यांना या परीक्षेत अपयश आलं आहे. अशा मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक खास पोस्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारात व्यग्र आहेत. तसंच त्यांच्या रॅली आणि सभाही होत आहेत. तरीही अपयश आलेल्या मुलांसाठी नरेंद्र मोदींनी खास पोस्ट लिहिली आहे.

काय आहे नरेंद्र मोदींची पोस्ट?
“UPSC च्या परीक्षेत ज्यांना यश आलं नाही त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की अपयश हा काही एखादा धक्का किंवा आघात नाही. अपयशाने खचून जायचं नसतं. एकदा आलेलं अपयश हे काही एखादा प्रवास जसा संपतो तसं नाही. जोमाने पुन्हा तयारीला लागा. आपला भारत देश हा संधींची कमतरता नसलेला देश आहे. या संधी इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत की ज्यामुळे तुमच्या कर्तृत्वाला वेगळी झळाळी मिळू शकते. काय काय शक्यता आहेत? त्यांचा विचार करा आणि पुढे जा. ज्यांना अपयश आलं आहे, त्यांना पुढच्या संधीचं सोनं करण्यासाठी माझ्या शुभेच्छा” या आशयाची पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिली आहे. जी चांगलीच चर्चेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी पोस्ट लिहिली आहे त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी मोदींना प्रश्न विचारला आहे की तुम्ही अपयश आलेल्या मुलांना सल्ला देत आहात तुमचं शिक्षण किती? तर काहींनी आरक्षण हटवण्याचीही मागणी या पोस्टच्या रिप्लायमध्ये केली आहे. एका युजरने भारतात २०१४ पर्यंत संधींची कमतरता नव्हती असं उत्तर या पोस्टवर दिलं आहे. देशाची लोकसंख्या कमी झाली तर ही समस्या मिटेल त्यावर उपाय शोधा अशीही मागणी काहींनी मोदींकडे केली आहे.