“शिवबा हे महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत!” – ह. भ. प. नूर महंमद अत्तार

0
151
  • श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव २०२४ – अंतिम पुष्प

पिंपरी (दिनांक : ११ एप्रिल २०२४) “विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा हे महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत आहेत; तर पंढरपूर हे भाविकांचे माहेर आहे!” असे प्रतिपादन ह. भ. प. नूर महंमद अत्तार यांनी बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे बुधवार, दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी केले. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवात कीर्तनसेवेच्या माध्यमातून ह. भ. प. नूर महंमद अत्तार आणि सहकारी यांनी अंतिम पुष्पाची गुंफण केली. याप्रसंगी मंदारमहाराज देव, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, ॲड. मोरेश्वर शेडगे, शेखर चिंचवडे, प्रताप बारणे, विश्वजित बारणे, गतिराम भोईर, मधू जोशी, मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे (पाटील), उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे (पाटील), हेमा दिवाकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

“पुत्राचिये वार्ता | शुभ ऐके जेवी माता | तैसें राहो माझें मन | गाता ऐकता हरिगुण | नादें लुब्ध जाला मृग | देह विसरला अंग | तुका म्हणे पाहे | कासवीचे पिल्ले माये |”

हा जगद्गुरू तुकोबाराय यांचा अभंग निरूपणासाठी घेण्यात आला होता. “जिजाबाई नसत्या तर शिवबा नसते अन् शिवबा नसते तर हिंदू धर्म अस्तित्वात राहिला नसता. स्वामी समर्थ यांची भक्ती करण्यासाठी हा नरदेह मिळाला आहे. भक्तांचे रक्षण करतात म्हणून त्यांना स्वामी समर्थ म्हणतात. स्वामी समर्थांची कृपा हवी असेल तर स्वतः त्या योग्यतेचे बना. गुरू शोधून मिळत नाही!” असे सांगून त्यांनी,
“श्री गुरुसारिखा असता पाठीराखा | इतरांचा लेखा कोण करी ||”
हा अभंग उद्धृत केला.
ह. भ. प. सुखदेवमहाराज बुचडे आणि सहकारी यांनी कीर्तनात साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या दरम्यान मंडळाच्या वतीने आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या चंद्रभागा तावरे यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तावरे कुटुंबीयांनी पुरस्कार स्वीकारला.

उत्सवात पहाटे ४:३० वाजता श्रींचा केशर दुधाने अभिषेक आणि पूजा, स्वामी गायत्री जप, श्रींचा सामुदायिक रुद्र अभिषेक, श्रींची आरती, महानैवेद्य आणि आरती, भाविकांसाठी महाप्रसाद वाटप, दुपारी १२:३० ते रात्री ८ वाजेपर्यंत भजनसेवा, सायंकालीन आरती इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाले. सत्संग मंडळाचे सदस्य कैलास भैरट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

  • प्रदीप गांधलीकर
    ९४२१३०८२०१
    ७४९८१८९६८२