अखेर सांगली काँग्रेसला मिळालीच नाही, शिवसेनेचे चंद्रहार पाटीलच उमेदवार

0
144

गेल्या काही दिवसांपासून सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू होता. या जागांवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, सांगली आणि भिवंडीच्या जागेवर काँग्रेसनं पाणी सोडलं आहे. सांगलीमधून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, तर भिवंडीतून राष्ट्रवादीचे सुरेश ऊर्फ बाळ्यामामा लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सांगली आणि भिवंडीतील काँग्रेसचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबईतील नरिमन पॉइंट येथील ‘शिवालय’ येथे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. याला शिवसेना ( ठाकरे गट ) अध्यक्ष उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे नेते जयंत पाटील आणि महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले, “काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना केंद्रातील तानाशाही सरकारनं दिलेल्या वर्तवणूक देशातील सगळ्यांना माहिती आहे. सोनिया गांधींची प्रकृती ठीक नसताना तासन् तास ईडीच्या कार्यालयात बसवून ठेवलं, हे काँग्रेसचा कार्यकर्ता विसरला नाही. त्यामुळे तानाशाही प्रवृत्तीच्या विरोधात काँग्रेसनं लढाई सुरू केली आहे. जागावाटपाचा तिढा आम्ही संपुष्टात आणला आहे. देशातील भाजप सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी मोठं मन करून आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केलं आहेत. आमची मते एकमेकांना पडणार आहेत.”