व्यापार सुंकुलात निवास असणाऱ्या मिळकतींचे तातडिने फायर ऑडिट करा – सिमाताई सावळे यांची प्रशासनाकडे मागणी

0
155

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील व्यवसायाच्या ठिकाणीच राहणाऱ्या मिळकतींचे तातडीने फायर ऑडिट करण्याची आग्रही मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमाताई सावळे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सिमाताई सावळे म्हणतात,
छत्रपती संभाजीनगरमध्ये काल पहाटे ३ वाजता एक भयानक घटना घडली आहे. किंग स्टाईल टेलर्स या कापड दुकानाला लागलेल्या आगीत एकाच परिवारातील दोन जणांचा होरपळून व पाच जणांचा गुदमरून मृत्यू झालाय. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये २ चिमुकल्यांसह, दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. आसिम वसीम शेख, (3 वर्ष), परी वसीम शेख (2 वर्ष), वसीम शेख (30 वर्ष), तन्वीर वसीम (23 वर्ष) हमीदा बेगम (50 वर्ष), शेख सोहेल (35 वर्ष) रेश्मा शेख (22 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. यात 8 महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेचाही समावेश आहे. या दुर्घटनेत दोन भावंडांचे कुटुंब संपले आहे. या घटनेत अग्निशमाक दलाचा एक जवानही जखमी झाला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात मागील काही महिन्यात तळवडे, शाहूनगर, चिखली आदी ठिकाणी भीषण आगीच्या घटना घडल्याची नोंद आहे. धक्कादायक म्हणजे त्यात मोठ्याप्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे. कहर म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरातील औद्योगिक क्षेत्रात आगीच्या घटनांमध्येसुध्दा मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व नियम २००९ हे ६ डिसेंबर २००८ नुसार दर सहा महिन्यांनी म्हणजे जानेवारी व जुलै महिन्यात अग्नी प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था सुस्थितीत असल्याचा दाखला (फायर ऑडिट) मिळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढला आहे. अशा स्थितीत आगीच्या घटनांचे प्रमाण अधिक वाढते. मागील काही वर्षात आगीच्या अनेक गंभीर घटना पिंपरी चिंचवड शहरासह राज्यात व देशभरात घडल्या आहेत. या आगीच्या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे, असे सिमाताईंनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयांसह अन्य आस्थापने व औद्योगिक कंपन्यांचे तातडीने फायर ऑडिट करणेबाबतचे पत्र मी यापूर्वी आपणास दिलेले आहे. परंतु मला हे अत्यंत खेदाने नमूद करावे लागत आहे कि उपस्थित केलेल्या मुद्द्यावर काय कार्यवाही केली हे कळविण्याची तसदी देखील आपण घेतलेली नाही. एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी या नात्याने आपण इतक्या गंभीर मुद्द्याची दखल घेऊन मानवी जीव वेळीच वाचविण्यासाठी आणि वित्त हानी टाळण्यासाठी येथोचीत कार्यवाही करणे अभिप्रेत आहे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
पूर्वी दिलेल्या तसेच आजच्या पत्राचा दाखला देत सिमाताई म्हणतात, आगामी दोन महिन्यांमध्ये उन्हाळी ऋतू लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील व्यवसायाच्या ठिकाणीच रहिवास असल्याचे मिळकतींमध्ये आगीच्या घटनांचा मुकाबला करण्यासाठी फायर एक्सटिंगग्वीशर लावले आहेत का ? लावले असल्यास ते रिकामे अथवा अपुरे आहेत का ? आग लागल्यास आगीची माहिती देणारे ऑटोमेटेड फायर अलॉर्म सिस्टम, इत्यादी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित आहेत का ? याबाबतचे फायर ऑडिट तातडीने करण्यात यावे. तसेच अग्निशमन दलाच्या वतीने काही प्रमुख ठिकाणी मॉक ड्रील देखील करण्यात यावे, अशी विनंती निवेदनात केली आहे.