शनिवार, दिनांक ६ एप्रिलपासून श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव

0
240

पिंपरी,दि.४ (पीसीबी) – श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाने शनिवार, दिनांक ०६ एप्रिल ते बुधवार, दिनांक १० एप्रिल २०२४ या कालावधीत बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव २०२४चे आयोजन केले आहे. त्यामध्ये शनिवार, ०६ एप्रिल रोजी डॉ. संजय उपाध्ये ‘मन करा रे प्रसन्न’ या विषयावर निरूपण करतील. रविवार, ०७ एप्रिल रोजी ह. भ. प. श्रेयस आणि मानसी बडवे या दांपत्याची कीर्तन जुगलबंदी होईल. सोमवार, ०८ एप्रिल रोजी ज्योती गोराणे आणि सहकारी यांचा ‘स्वर जोर्तिमय शाम’ हा बहारदार गीतांचा कार्यक्रम होणार असून मंगळवार, ०९ एप्रिल रोजी भक्तिगंधर्व मुकुंद बादरायणी आणि सहकारी ‘स्वरसमर्थ अभंगवाणी’ सादर करतील. या सर्व कार्यक्रमांची वेळ सायंकाळी ०६ वाजताची आहे. गुढीपाडव्यानिमित्त ०९ एप्रिल रोजी सायंकाळी ५:३० वाजता ज्येष्ठ स्वामीभक्त मधू जोशी यांच्या व्याख्यानाचा लाभ घेता येईल. बुधवार, १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त ह. भ. प. कबीरमहाराज अत्तार कीर्तनसेवा रुजू करणार असून ह. भ. प. सुखदेवमहाराज बुचडे आणि सहकारी साथसंगत करतील. दुपारी १२:३० ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय रोज पहाटे ०४:३० वाजेपासून श्रींना अभिषेक आणि पूजा, श्रींची आरती, स्वामी स्वाहाकार, श्री गुरुलीलाअमृत ग्रंथ पारायण, दुपारी १२ वाजता महानैवेद्य आणि आरती, सायंकाळी श्रींची आरती हे धार्मिक विधी संपन्न होतील. ०७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या काळात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या उत्सवाचा लाभ सर्व भाविकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे (पाटील) आणि श्री स्वामी समर्थ विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.