भाजप खासदार उन्मेश पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल

0
142

दि 3 एप्रिल (पीसीबी )- भारतीय जनता पक्षाने तिकीट कापलेले जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटात अधिकृतपणे प्रवेश केला. स्वतः ठाकरे आणि नेते संजय राऊत यांनी त्यांचे शिवबंधन बांधून स्वागत केले. आता जळगावातून पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत.
मंगळवारी पाटील यांनी संजय राऊत व पाठोपाठ उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हाच ठाकरे गटातील प्रवेश निश्‍चित झाला होता. आज दुपारी साडेबाराला ‘मातोश्री’वर त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला आणि त्यानुसार वाजतगाजत तो झाला. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. उन्मेष पाटील यांच्याबरोबर त्यांचे मित्र व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला. लोकसभा उमेदवारीसाठी करण पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब जवळपास झाले आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून जाहीर झालेली स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटलांना जळगाव लोकसभेची उमेदवारी ऐनवेळी देण्यात आली होती. साडेचार लाखांच्या मताधिक्याने त्यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकरांचा पराभव केला. पाच वर्षांत खासदार म्हणून काम चांगले असूनही उमेदवारी कापल्याच्या नाराजीतून त्यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.