भाजप नेते उन्मेश पाटील ठाकरे गटात

0
168

दि 2एप्रिल (पीसीबी )- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग चालू आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील अनेक विरोधी पक्षांमधील कित्येक नेत्यांनी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये प्रवेश केला आहे. तर सत्ताधारी पक्षावर नाराज असलेल्या काही नेत्यांनी आपला मोर्चा विरोधी पक्षांकडे वळवला आहे. महाराष्ट्रातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. निवडणुकीच्या आधी काँग्रेसला गळती लागल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष फुटला आणि पक्षाचे दोन गट पडले. यापैकी एक गट सध्या भाजपाबरोबर सत्तेत बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थितीदेखील सारखीच आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचं तिकीट न मिळाल्याने, अथवा तिकीट मिळावं या उद्देशाने अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं आहे. अशातच भाजपाचा एक मोठा नेता शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करून मनगटावर शिवबंधन बांधणार असल्याचं बोललं जात आहे. पाटील हे खासदार संजय राऊतांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलं आहे. भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं आहे. पाटील यांच्याऐवजी भाजपाने जळगावातून स्मिता वाघ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी उन्मेश पाटील शिवसेनेच्या ठाकरे गटात जाणार असल्याचं बोललं जात आहे.