रवि राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे काय ?-अमरावतीत भाजप कार्यकर्ते संभ्रमात

0
228

अमरावती लोकसभा मतदासंघात अगोदर उमेदवारी जाहिर करून नंतर पक्षात प्रवेश केलेल्या नवनीत राणा यांच्याबाबत भाजपचे तमाम कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संभ्रमात पडले आहेत. युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा त्यांचे पती रवि राणा यांच्याकडे सोपवून नवनीत राणा यांनी भाजप प्रवेश केला मात्र, त्यांच्या खांद्यावर जुन्या पक्षाचे उपरणेसुध्दा कायम होते. आता आमदार रवि राणा यांनी प्रथम आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. कमळाच्या चिन्हावर नवनीत राणा लढणार आणि उद्याच्या विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकिला तेच रवि राणा आमच्या विरोधात त्यांच्या पक्षाचे उमेदवार उभ करणार नाहीत कशावरून, असा सवाल उपस्थित केला आहे.

गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून खासदार नवनीत राणा यांच्‍या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. पण, बुधवारी रात्री नाट्यमय घडामोडींमध्‍ये नवनीत राणा यांना भाजपकडून आधी उमेदवारी जाहीर झाली. नंतर त्‍यांनी युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या सदस्‍यत्‍वाचा राजीनामा त्‍यांचे पती रवी राणांकडे सोपवला. त्‍यानंतर नागपुरात भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍या उपस्थितीत भाजप प्रवेशाचा सोपस्‍कार पार पडला. भाजपवर हा उलट्या प्रवासाचा प्रसंग का ओढवला, याची चर्चा आता रंगली आहे.
रवि राणा य़ांनी त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे अस्तित्व कायम ठेवल्याने गोँधळाचे वातावरण आहे. आगामी काळात त्यांना विधानसभा लढायची आणि त्यावेळी मुस्लिम, मागास मतांचे समिकरण साधण्यासाठी त्यांनी ही चलाखी केली असावी. भाजप कार्यकर्त्यांना त्याचीच चिंता आहे. २०१९ मध्ये नवनीत राणा या काँग्रेस, राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होत्या. नंतरच्या काळात त्यांनी मोदींचे समर्थन केले. आता अमरावतीची भाजप उमेदवारी मिळाल्याने भाजपचे नेटवर्क त्यांना आयतेच मिळाले. महायुतीचा उनमेदवार म्हणून भाजप कार्यकर्ते कमळ चिन्हाचा प्रचार करतील, मात्र आगामी काळात विधानसभेला रवि राणा भाजपच्या विरोधात ठाकतील त्याचे काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात काम करण्याचे अगोदरच जाहीर केले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते आनंदराव आडसूळ आणि त्यांचे चिरंजीव कॅप्टन आडसूळ यांनीसुध्दा राणा दांम्पत्याच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत. भाजपचे जिल्ह्यातील नेते, कार्यकर्तेसुध्दा कडवा विरोध करत असताना नवनीत राणा यांना फडणवीस यांनी उमेदवारी दिल्याने टॉप टू बॉटम कार्यकर्ते संभ्रमात आहेत.