विद्यार्थीनीसोबत गैरवर्तन केल्या प्रकरणी संस्थाचालकावर गुन्हा दाखल

0
287

हिंजवडी, दि. २१ (पीसीबी) – एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेच्या चालकाने आपल्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलींसोबत अश्लील वर्तन तसेच शेरेबाजी केल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार हिंजवडी येथील पुणे इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस स्टडीज अलार्ड (पी आय बी एस) येथे 1 ऑगस्ट 2023 ते 17 मार्च 2024 या कालावधी घडला.

संस्थेत शिक्षण घेणाऱ्या एका पिडीत मुलीने या प्रकरणी 17 मार्च 2024 रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्थाचालक अरींधम घोष याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घोष हे पीआयबीएस कॉलेजचे संस्थापक आहेत. पीडित मुलीने 2023 मध्ये या कॉलेजमध्ये एमबीए ॲग्रीसाठी प्रवेश घेतला होता. 1 ऑगस्ट 2023 रोजी कॉलेज सुरू झाल्यानंतर अवघ्या 10 ते 12 दिवसांनी आरोपी घोष याने क्लास सुरू असताना पिडीत मुलीला सर्व वर्गासमोर लज्जास्पद वर्तणूक दिली. मात्र, आरोपी संस्थाचालक असल्याने मुलीने याची कुठे वाच्यता केली नाही. त्यानंतर काही दिवसांनी पीडिता कॉलेजमध्ये जीन्स पँट घालून गेली असता त्यावरून ही आरोपीने पिडीतेची तिच्या मैत्रिणींसमोर बदनामी केली.

त्यानंतर एका महिन्याने पीडिता आणि तिची मैत्रीण आरोपीकडे काही विषयांची माहिती घेण्यासाठी गेल्या असता, आरोपीने बळजबरीने पिडीतेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रिणी आरोपी घोष याला प्रतिसाद देत नसल्याने त्याने सर्वांना कमी मार्क दिले. तसेच घरी फोन करून मुलगी कॉलेजला येत नाही, चांगली संगत नाही, अशी तक्रार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.