त्यांनी माझी मुख्यमंत्रीपदाची संधी घालवली…

0
281
  • माजी मंत्री अनंतराव थोपटे जुने उट्टे काढणार ?

शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज भोर येथे अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी थोपटे यांनी माध्यमांशी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार यांच्यामुळे मुख्यमंत्रिपद हुकल्याचं आवर्जून सांगत यंदा बारामती लोकसभेला प्रचार कुणाचा करायचा हे अद्याप ठरवले नसल्याचे थोपटे म्हणाले. त्यांचे हे विधान शरद पवार यांना धक्का असल्याचे मानले जात आहे.

अनंतराव थोपटे म्हणाले, “त्यावेळी दिल्ली माझ्यासोबत होती. मात्र शरद पवार शेवटपर्यंत माझ्या विरोधात होते. त्यामुळे तेव्हा माझा पराभव कसा झाला हे सर्वांना माहिती आहे”, असे सांगून तत्कालिन पराभवाला थोपटे यांनी शरद पवार यांना जबाबदार धरले. थोपटे यांच्या या विधानाने त्यांच्यातील पवारविरोधाचे दर्शन घडून लोकसभा निवडणुकीत ते काही वेगळा विचार करतील का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

पुढे बोलताना अनंतराव थोपटे म्हणाले की, शरद पवार मला काही दिवसांपूर्वी भेटून गेले आहेत. शरद पवार यांची मुलगी आणि अजित पवार यांची पत्नी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. याच लोकसभा मतदारसंघातून विजय शिवतारे इच्छुक आहेत. त्यामुळे मी कुणाचा प्रचार करणार हे मी कुणालाही सांगितलेले नाही किंवा त्याबाबत कोणताही विचार केलेला नाही, असे विधान करून बारामतीत नव्या समीकरणाच्या नांदीचे संकेत थोपटे यांनी दिले.

अनंतराव थोपटे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असताना थोपटे यांना शरद पवार यांनीच विरोध केला होता. त्यावेळी थोपटे यांच्याविरोधात काशिनाथ खुटवड यांना उमेदवारी देऊन अनंतराव थोपटे यांचा पराभव केला होता. त्यानंतर तब्बल २५ वर्षानंतर शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. त्यावेळीही शरद पवार यांनी सोनिया गांधी यांचा परदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर थोपटे यांच्याविरोधात उमेदवार देऊन त्यांचा पराभव केला होता.