मृत माशांना वाहिली श्रद्धांजली

0
295

पिंपरी, दि.२० – दिलासा संस्था तसेच मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पवना नदी घाट, पिंपळे गुरव येथे मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ रोजी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून पवना आणि इंद्रायणी नदीतील मृत माशांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक आणि पर्यावरणतज्ज्ञ तानाजी एकोंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तर ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते नारायण कुंभार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वृक्षमित्र अरुण पवार, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के, साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी आपल्या मनोगतातून पवना आणि इंद्रायणी या नद्यांची पूर्वस्थिती, प्रदूषित अवस्था, पर्यावरणाचा ऱ्हास आणि पर्यावरण संवर्धनासाठीची कृतिशीलता याविषयी सविस्तर ऊहापोह केला. जलचर जीवसृष्टीला जीवित ठेवणे हेच माणसाचे काम आहे यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करण्यात आला.

याप्रसंगी संगीता झिंजुरके, जयश्री गुमास्ते, शोभा जोशी, योगिता कोठेकर, सुभाष चव्हाण, प्रकाश घोरपडे, अशोकमहाराज गोरे, कैलास भैरट, मुलानी महंमद शरीफ, शंकर नाणेकर, मुरलीधर दळवी, प्रकाश बंडेवार, प्रकाश वीर, संजय गमे, शामराव सरकाळे, बाळासाहेब साळुंके, चांगदेव गर्जे, रघुनाथ पाटील, मालोजी भालके, रवींद्र तळपाळे, शंकर कुंभार, विकास कोरे, भरत कुंभार, अरुण परदेशी, रामराव दराडे, रवींद्र कंक, राजेंद्र पगारे, राम डुकरे, सागर पाटील, ईश्वरलाल चौधरी, पंकज पाटील यांनी मृत माशांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण केली.

दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, नदी प्रदूषित होत आहे हा आवाज पिंपरी चिंचवड महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ यांच्यापर्यंत पोहचावा अन् सुधारणा व्हाव्या याच उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे अध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.