बनावट एन्काउंटरप्रकरणी प्रदीप शर्मा यांना जन्मठेप

0
239

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे. 2006 च्या लखनभैया बनावट एन्काउंटरप्रकरणी प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2006 च्या लखनभैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय मंगळवारी निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने 8 नोव्हेंबर 2023 रोजी या 2006 मध्ये दाखल केलेल्या 16 अपिलांच्या सुनावणीवर निकाल राखून ठेवला होता.

लखनभैयाचे खरे नाव रामनारायण गुप्ता असून, त्याच्याविरुद्ध गँगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी संध्याकाळी लखनभैयाचा मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वर्सोवा सात बंगला येथील नाना नानी उद्यानाजवळ पोलिसांच्या बनावट चकमकीत मृत्यू झाला होता. या चकमकीचे नेतृत्व एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी केले होते.

2006 मध्ये झालेल्या या एन्काउंटरची एसआयटीने चौकशी केल्यानंतर ती चकमक बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर लखनभैया एन्काउंटरप्रकरणी प्रदीप शर्मांसह 13 पोलिस अधिकारी आणि इतर पोलिसांना अटक करण्यात आली. त्यांचे 2008 मध्ये निलंबित केले होते. प्रदीप शर्मा हे 1983 च्या बॅचचे अधिकारी होते. ते 2020 मध्ये ते निवृत्त होणार होते. मात्र, तत्पूर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेत त्यांनी राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकारणात त्यांना अपयश आले.