नदी प्रदूषणावरून पोकळ घोषणा कशाला; संजोग वाघेरे यांचा सवाल

0
184

निवडणुकांच्या तोंडावर सरकार घोषणा करत असल्याची टीक

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) :- राज्य सरकारचे मंत्री पिंपरी चिंचवड शहरात येऊन नद्यासाठी आम्ही आगामी तीन वर्षात दोन हजार कोटी खर्च करणार असल्याची घोषणा करत आहे. परंतु, ज्यांच्यासाठी ते या घोषणा करत आहेत. त्यांनी दहा वर्षाच्या आपल्या कारकीर्दीत नदी प्रदूषण रोखण्यासाठी काय केले आणि निव्वळ निवडणुकीच्या तोंडावर नदी प्रदूषणाचा आधार घेत पोकळ घोषणा कशाला, असा थेट सवाल शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे यांनी केला आहे.

संजोग वाघेरे पाटील यांनी नदी प्रदूषणावरून सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी पिंपरी चिंचवडकर नागरिक व मावळमधील शेतकरी वर्गाची दिशाभूल करत असल्याची टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मावळ, मुळशीतून येणा-या, तसेच पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनेक ठिकाणी थेट नाले नदीत जाऊन मिळतात. एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी नदीत मिसळते. त्यामुळे वारंवार नदी पात्रात फेस निर्माण होत आहे. अनेकवेळा मासांचा मृत्यू होतो. हा प्रदूषणाचा विषय अद्याप गांभीर्याने घेतला जात नाही.

देहू – आळंदी ही वारकऱ्यांची आणि संतांची भूमी असलेल्या या नद्यांचे प्रकल्प यापूर्वीच व्हायला पाहिजे होते. एवढा उशीर का लागला, निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने देण्याचे काम खासदार आणि राज्य सरकारचे काही मंडळी शहरात येऊन करत आहेत. परंतु यापूर्वी त्यांना नदी प्रदूषणाचे गांभीर्याने दिसले नाही. मागील कित्येक वर्षांपासून हा प्रश्न होता. मागील दहा वर्षात ज्यांना नद्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी होती. त्यांनी या कालावधीत काय केले, असा प्रश्न वाघेरे यांनी केला आहे.

नदी प्रदूषणाबाबत उपाययोजना करा; प्रशासनाला पत्रव्यवहार

देहूगाव येथे इंद्रायणी नदीच्या काठावर बुधवारी मोठ्या संख्येने मासे मृतावस्थेत आढळले. या नदीत देवमाशांसारखे दुर्मिळ मासे देखील असल्याचे दिसून आले. हा प्रकार गंभीर असून या संदर्भात संजोग वाघेरे पाटील यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडी) आणि पिपंरी चिंचवड महापालिका प्रशासनाला पत्र पाठवले आहे. त्यात नदी प्रदूषणाचा विषय गांभीर्याने घेऊन ते रोखण्याकरिता आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याची मागणी केली आहे.