न्यूर्याक, दि. १४ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन भारतीयांसह चार जणांना कॅनडाच्या सीमेजवळील एका ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. यूएस बॉर्डर पेट्रोलने एका महिलेसह चार जणांना डाउनटाउन बफेलोमधील आंतरराष्ट्रीय रेल्वे पुलावर चालत्या मालवाहू ट्रेनमधून उडी मारल्यानंतर अटक केली.
चौथी व्यक्ती डॉमिनिकन रिपब्लिकची नागरिक आहे. पोलीस जवळ येताच त्या पुरुषांनी जखमी महिलेला सोडून तेथून पळ काढला. मात्र पोलिसांनी त्या पुरुषांना पाठलाग करून पकडले. जखमी महिलेला एरी काउंटी शेरीफचे अधिकारी आणि यू.एस. कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (CBP) अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार दिले.
यानंतर महिलेला रुग्णवाहिकेतून स्थानिक वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले. या चौघांकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे तपासात समोर आले आहे. तिन्ही पुरुषांना बटाविया फेडरल डिटेन्शन सेंटरमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे, जेथे ते हद्दपारीच्या सुनावणीपर्यंत राहतील, असे मीडिया रिलीझमध्ये म्हटले आहे.