देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार बारामतीतून जिंकू शकत नाहीत

0
209

पुणे, दि. १३ (पीसीबी) – “देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार म्हणजेच अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून जिंकू शकणार नाहीत. कारण, त्यांचा उर्मटपणा…याला पाडा…त्याला पाडा…हे बरे नसते… अशी जळजळीत भाषा करीत शिवसेनेचे नेते, माजी मंत्री विजय शिवतारेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघात घेरण्याचा इरादा पक्का केला. एक हजार टक्के मी निवडणूक लढणार असल्याचेही शिवतारेंनी छातीठोकपणे सांगण्याचा प्रयत्न केला. निवडणूक लढण्याची भूमिका स्पष्ट करताना शिवतारेंनी अजितदादांवर जहरी टीका केली. त्यामुळे अजितदादा-शिवतारेंमधील राजकीय वैर वाढल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, शिवतारे यांच्या भूमिकेमुळे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अडचणीत आल्याने राष्ट्रवादी काँँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विजय शिवतारे म्हणाले, “बारामती मतदारसंघ कुणाचा सातबारा नाही. त्यामुळे पवार..पवार करण्याऐवजी निश्चितच आपण लढलं पाहिजे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांच्या विरोधात प्रचार हा राजकारणाचा एक भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. वैयक्तिक हितासाठी प्रचार केला नव्हता.”

“पण अजित पवारांनी सभ्येतीची नीच पातळी गाठली. मी 23 दिवस लीलावती रुग्णालयात दाखल होतो. मी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून विधानसभेचा प्रचार केला. तेव्हा अजित पवारांनी पालखीतळावरून सांगितलं, ‘मरायला लागला आहे, तर कशाला प्रचार करताय? लोकांची सहानुभूती घेण्यासाठी खोटं बोलत आहात.’ माझ्या गाडीच्या नंबरपर्यंत खालच्या स्तरावर अजित पवार आले. राजकारणात निवडून आणण्यासाठी सकारात्मक प्रवृत्ती असावी. तेव्हा अजित पवारांनी उर्मट भाषा केली होती,” असं टीकास्र शिवतारेंनी सोडलं.

“अजित पवारांची गुर्मी तशीच”
“मी अजित पवारांना माफ केलं आहे. महायुतीत आल्यानंतर मी त्यांची भेट घेतली. पण, तरीही अजित पवारांची गुर्मी तशीच होती. दौंडमधील नागरिकांनी म्हटलं की, ‘अजितदादा उर्मट आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंना मतदान करणार आहे’,” असं शिवतारेंनी सांगितलं.

“अजित पवारांची विश्वाससार्हता संपली”
“पुरंदरचे लोक बदला घेण्याबद्दल बोलत आहेत. पण, नियती बदला घेईल. पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर अजित पवारांची विश्वाससार्हता संपली होती. त्यामुळे बारामती मतदारसंघातील घराणेशाही आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना निवडणुकीचा हक्क मिळण्यासाठी मी लढणार म्हणजे लढणार,” असा निर्धार शिवतारेंनी व्यक्त केला.

“आम्ही पुण्याचे मालक अशी अजित पवारांची मानसिकता”
“पवार विरुद्ध बारामतीतील सर्वसामान्य माणूस अशी ही लढाई असणार आहे. सर्वांना पवारांनी त्रास दिला आहे. भोरचे अनंतराव थोपटे 1999 मध्ये मुख्यमंत्री झाले असते. पण, त्यांना पाडण्यात आलं. संग्राम थोपटेंना महाविकास आघाडीत मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष अजित पवारांनी होऊ दिलं नाही. आम्ही पुण्याचे मालक अशी अजित पवारांची मानसिकता आहे. लोकसभेला हर्षवर्धन पाटलांकडून मतदान करून घ्यायची आणि विधानसभेला त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करण्यात आले. अशा प्रकारची फसवेगिरी करण्यात आली. जन्मजात लोकांना फसवणे हा त्यांचा अधिकार आहे,” असा हल्लाबोलही शिवतारेंनी केला आहे.