मुंबई, दि. ११ (पीसीबी) – ईडीचा गैरवापर करुन संजय राऊत, अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे रोहित पवारांना अटक होईल की नाही सांगता येत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. ठाकरे गटातील जोगेश्वरीचे आमदार रविंद्र वायकर यांनी रविवारी शिंदे गटात प्रवेश केला. यावर पवार म्हणाले,”तपास यंत्रणांकडून कारवाई सुरु झाल्याने आमदार वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कारवाई सुरु झाली की पक्ष बदलला असे झाले आहे. एक जण आता महत्वाचे मंत्री आहेत, असे सांगत शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
पारनेरचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु आहे. यावर पवारांना विचारले असता ते म्हणाले, ” निलेश लंके यांच्या प्रवेशाबाबत मला माहिती नाही.हे मी तुमच्याकडून ऐकतो आहे,”
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप संपलेला नाही. जागा वाटपाबाबत पवार म्हणाले,” जागा वाटपाचा प्रश्न राहिलेला नाही. प्रकाश आंबेडकर यांना किती जागा द्यायच्या याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होणार आहे. आंबेडकरांचे एक पत्र मला आले आहे. त्यात त्यांनी मते मांडली आहे. त्यावर चर्चा सुरु आहे. आंबेडकरांच्या हेतुवर शंका घेणे योग्य नाही,” “रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांना बरोबर घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे, असे पवार म्हणाले.
१५ ते १७ तारखे दरम्यान निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. निवडणूक कधी जाहीर होणार यांची वाट पाहत आहोत. निवडणूक यंत्रणेची आम्हाला चिंता वाटते, असा टोला पवारांनी लगावला.