नवी दिल्ली, दि.८ (पीसीबी) – प्रसिद्ध लेखिका, इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सुधा मूर्ती यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच या निवडीबाबत आनंद व्यक्त केला. दरम्यान, राज्यसभेवर निवड झाल्यानंतर सुधा मूर्ती यांनी म्हटलं आहे की, त्या सध्या भारतात नाहीत. परंतु, महिला दिनानिमित्त त्यांना मिळालेली ही मोठी भेट आहे. देशासाठी काम करण्यासाठी एक नवीन जबाबदारी मिळाली आहे. मूर्ती यांनी या निवडीबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड केल्याचा मला खूप आनंद झाला आहे. सामाजिक कार्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधा मूर्ती यांनी अतुलनीय आणि प्रेरणादायी योगदान दिलं आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती हा आपल्या नारी शक्तीचा एक सशक्त पुरावा आहे. आपल्या देशाचं भवितव्य घडवण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. सुधा मुर्ती यांची राज्यसभेतील उपस्थिती महिलांची ताकद आणि क्षमता दर्शवते. यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी मी सुधा मूर्ती यांना शुभेच्छा देतो.