धक्कादायक… ड्रग्ज प्रकऱणात निगडीतील फौजदारालाच बेड्या

0
1439

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – चिंचवड शहरातील रक्षक चौकात दोन कोटींचे मेफेड्रोन ड्रग्ज नुकतेच आढळले होते. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात नमामी झा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता या गंभीर गुन्ह्यात निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या विकास शेळके या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव समोर आले असून त्याला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटने प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी विजय मोरे यांनी फिर्याद दिली होती. सुमारे ४५ कोटींचे ड्रग्ज सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक चौक या ठिकाणी अज्ञात व्यक्तीकडून दोन कोटी दोन लाख रुपयांचे २ किलो ३८ ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी नमामी झा याला अटक करण्यात आली. या गंभीर घटनेची दखल घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासात पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेचे नाव पुढे आले असून ड्रग्जच्या या गंभीर गुन्ह्यात त्याचा सहभाग आढळला आहे. आरोपींना न्यायालयात घेऊन जाण्यात येत आहे. ड्रग्जच्या प्रकरणात थेट पोलिस उपनिरीक्षकाचाचा सहभाग असल्याने पिंपरी- चिंचवड पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे. या ड्रग्जप्रकरणी आणखी खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.