महायुतीकडे दोनशे आमदार असून उमेदवार सापडेना – डॉ. अमोल कोल्हे

0
154

पुणे, दि. २ (पीसीबी) : ‘महायुतीकडे दोनशे आमदार, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतानाही, त्यांना एक उमेदवार ठरवता येत नाही. याउलट शरद पवार यांनी माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील तरुणावर विश्‍वास दाखविला आहे. महायुतीमध्ये संभ्रम असल्यानेच त्यांना उमेदवार सापडत नाही,’ अशी टीका शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शिरूर लोकसभा मतदारसंघातील बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी डॉ. कोल्हे उपस्थित होते. पवार यांनी या वेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड-आळंदी, आंबेगाव-शिरूर, जुन्नर या तीन विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला. या बैठकीनंतर डॉ. कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

‘शिरूरची निवडणूक अमोल कोल्हे विरुद्ध अन्य कोणी अशी वैयक्तिक नाही,’ असे सांगून शरदचंद्र पवार पक्षातर्फे आपली उमेदवारी पक्की असल्याचेच डॉ. कोल्हे यांनी एकप्रकारे सूचित केले. ‘पवार यांनी माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील तरुणावर विश्‍वास दाखविला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेमध्ये पाच वर्षे काम केले आहे. त्याची ही पोचपावती आहे,’ असेही डॉ. कोल्हे यांनी नमूद केले.

शिवाजीराव आढळराव पाटील पक्षबदल करणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता, ‘कोणाचे मूल्यमापन काय करायचे, हे जनताच ठरवेल,’ असे डॉ. कोल्हे म्हणाले. ‘छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाच्या विकासकामाच्या भूमिपूजनाचे निमंत्रण मला मिळालेले नाही,’ असेही त्यांनी सांगितले.

‘बारामतीमध्ये ‘गोविंदबाग’ येथे जेवणासाठी येण्याचे शरद पवार यांनी दिलेले निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले असते, तर महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाची आस्था बाळगणारे नेते म्हणून ते पुढे आले असते,’ असा टोलाही डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला.

मोदी सरकारने गुबूगुबू वाजल्यानंतर माना डोलावणारे नंदीबैल संसदेत पाठवायचे की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी डरकाळी फोडणारे वाघ संसदेत पाठवायचे, हे ठरवण्याचे काम ही लोकसभेची निवडणूक करील, असंही डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.