‘एमडी’ धंद्यात पोलीस फौजदाराचाच सहभाग

0
433

पिंपरी: कोट्यवधींच्या मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज विक्रीच्या प्रयत्नातील हॉटेल कामगाराला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या कामगाराच्या संपर्कातील पोलीस फौजदाराचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा संशय असल्याने

पिंपरी चिंचवड: कोट्यवधींच्या मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज विक्रीच्या प्रयत्नातील हॉटेल कामगाराला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या कामगाराच्या संपर्कातील पोलीस फौजदाराचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा संशय असल्याने आता त्या फौजदाराचीच चौकशी सुरू करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी (दि. १) पहाटे साडेचारच्या सुमारास पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. नमामी शंकर झा (वय ३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तर निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या एका फौजदाराची याप्रकरणी कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

एक व्यक्ती विशालनगर परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्यातील अंमलदार विवेक गायकवाड यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानंतर सांगवी पोलिसांनी सापळा रचला असता, पिंपळे निलख परिसरात नमामी शंकर झा हा एमडी विक्रीसाठी आला असताना त्याला पकडण्यात आले. हॉटेलमध्ये कामगार असणाऱ्या झा हा राहात असलेल्या घराची झडती घेण्यात आली. त्यात एकूण २ किलो ३८ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आले.

एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी कुठून आणले, याची विचारणा पोलिसांनी आपल्या पद्धतीने केल्यावर झा याने निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या एका फौजदाराचे नाव घेतले. सांगवी पोलिसांनी अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. त्यानंतर संबंधित फौजदाराला सांगवी पोलीस ठाण्यात पाचारण करून त्याची दिवसभर चौकशी सुरू होती.

संबंधित फौजदाराचा झा याच्याशी कसा संपर्कात आला? झा याने २ कोटी २ लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज कुठून आणले, हे अद्याप उघड झालेले नाही. त्याचबरोबर फौजदाराचा या सगळ्या प्रकरणात नेमका काय संबंध आहे, हेदेखील अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याने अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, फौजदाराचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध उघड होत असल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

ललित पाटील आणि कुरकुंभ लिंक?

चाकण परिसरातील अडीच वर्षांपूर्वी २० कोटी रुपयांचे एमडी पकडण्यात आले होते. कुख्यात ड्रग्ज तस्कर ललित पाटील आणि अन्य लोकांचा सहभाग तेव्हा उघड झाला होता. मात्र, अडीच वर्षांनंतर ससून हॉस्पिटल आवारात अडीच कोटींचे एमडी सापडले. पुढे काही दिवसांनी ललित पाटील हा काही पोलिसांच्या आशीर्वादानेच ससून हाॅस्पिटलमधून पळून गेला. हे प्रकरण राज्यात गाजले. मागील आठवड्यात पुणे पोलिसांनी एक-दोन नव्हे तर हजारो कोटी रुपयांचे एमडी पकडले. तसेच कुरकुंभ, रांजणगाव येथील एमडीचे कारखाने उघडकीस आले. आता सांगवी पोलिसांनी पकडलेल्या एमडीची लिंक ललित पाटील तसेच करकुंभ येथील एकआयडीसीसोबत जुळते काय, याचा उलगडा येत्या काळात होण्याची शक्यता आहे.