आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला आमदार दिलिप मोहितेंचा कडवा विरोध कायम

0
258

पुणे, दि. २८ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) शिवाजीराव अढळराव पाटील यांचं स्वागत करणार असेल तर मी माझा निर्णय घेईन, असं वक्तव्य अजित पवार गटातील आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलं आहे. शिवाजीराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाच्या चर्चेवर दिलीप मोहिते यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाजीराज अजित पवार गटात प्रवेश करतील आणि त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. यावर शिवाजीरावांचे राजकीय विरोधक दिलीप मोहितेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मोहिते-पाटील म्हणाले, मी तब्बल २० वर्षे त्यांच्याबरोबर संघर्ष केला आहे. आता अशा प्रकारचं राजकारण करण्यापेक्षा मी घरी बसेन.

शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील हे सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. त्यांना पून्हा एकदा शिरुरमधून लोकसभा निवडणूक लढवायची आहे. परंतु, महायुतीत शिरूरची जागा अजित पवार गटाला मिळणार आहे. शिरूरमधून उमेदवारी मिळावी यासाठी शिवाजीराव अढळराव पाटील अजित पवार गटात जाण्यास तयार असल्याची चर्चा आहे. यावर शिवाजीरावांचे राजकीय विरोधक दिलीप मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील आमदार मोहिते पाटील यांनी काही वेळापूर्वी विधान भवनाबाहेर टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की शिवाजीराज अढळराव पाटील अजित पवार गटात आले तर तुम्ही त्यांचं स्वागत करणार का? त्यावर मोहिते-पाटील म्हणाले, ही केवळ चर्चा आहे.