मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणूक रिंगणात ?

0
329

जालना, दि. २७ (पीसीबी) – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मात्र जरांगेंवर दिवसेंदिवस आरोप प्रत्यारोपाचं प्रमाण वाढत असताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी जरांगेंवर त्यांचे जिवलग मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर जरांगे यांच्या सहकारी सुनिता वानखेडे यांनी देखील आरोप केले होते. मराठा आरक्षणामुळे राज्यात वातावरण तापलं होतं तसेच राजकारणात देखील तापलं होतं. मात्र सध्या चर्चा आहे ती जरांगेंच्या राजकीय एन्ट्रीची.

जरांगेंची राजकारणात एन्ट्री?
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र याबाबत भाजपच्या नेत्याने खुलासा केला आहे. माध्यमांशी बोलत असताना भाजप नेते आशिष देशमुख म्हणाले की, बीड लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. आशिष देशमुख यांनी केलेल्या खुलाशामुळे राजकारणात चर्चांना उधाण आलं असून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

पुढे आशिष देशमुख म्हणाले की, “बीड लोकसभा मतदारसंघातून जरांगे यांना शरद पवार गट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. सुरवातीपासूनच जरांगेंना राजकीय महत्त्वकांक्षा होती, म्हणूनच त्यांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं केलं आणि एवढे महिने लांबवलं.

आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत बीडची जागा मिळावी म्हणून पवार गटाचे प्रयत्न राहणार असणार आहे. ती जागा शरद पवार गटाला सुटल्यानंतर तिथे मनोज जरांगे यांना उमेदवारी दिली जाईल, असंही देशमुख म्हणाले. तसेच राजेश टोपे सातत्याने मनोज जरांगे यांना भेटून आंदोलनाची दिशा निश्चित करत होते, असा आरोपही आशिष देशमुख यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला-
तर दुसरीकडे वंचिक बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंना एक सल्ला दिला आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जालना जिल्ह्यातून स्वतः जरांगेंनी अपक्ष निवडणूक लढवावी. जरांगेंना लाखो मराठा समाज पाठिंबा देईल. शिवाय त्यांनी समाजाला काँग्रेस असो की भाजप या दोघांनाही मतदान करू नका असं आवाहन करावं.