अल्पवयीन मित्राची हत्या,घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर

0
574

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकणमध्ये अल्पवयीन गुन्हेगाराने दुसऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्या करून आरोपीने घटनेच्या व्हिडिओची इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली होती. या घटनेनंतर हत्येचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना साडे अकराच्या सुमारास घडली आहे.

चाकणमध्ये तीन अल्पवयीन मुले मद्यपान करायला बसली होती. त्यापैकी, दोघेजण हे सराईत गुन्हेगार होते. त्यादरम्यान, तिघांमध्ये वाद झाला. आरोपीसोबत असलेल्या मुलाला हत्या झालेल्या मुलाने कानशिलात लगावली. त्यावेळी सतरा वर्षीय सराईत गुन्हेगाराने त्याची डोक्यात दगड घालून हत्या केली. सहकार्याने हत्येचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला. मीच त्याची हत्या केली असं म्हणत तो व्हिडिओ काढायला सांगतो. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तात्काळ दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हत्या झालेल्या अल्पवयीन मुलावर खून केल्याप्रकरणी तर हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलावर पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.