मनोज जरांगेंनी मागितली फडणवीसांची माफी

0
307

जालना, दि. २७ (पीसीबी) : मराठा आरक्षणावरुन राज्यातील राजकारण फरच खालच्या पातळीवर गेल्याचे दिसून येत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आई – बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा निघाला. यावरुन जरांगेंनी आज आई – बहिणीवरून कोणाला काही बोललो असल्यास मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागत असल्याचे सांगत दिलगीरी व्यक्त केली आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarenge) यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून सगेसोयऱ्यांसह आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आमरण उपोषण केले. याबाबत सरकारने अधिसूचना देखील काढली. मात्र सगेसोयऱ्यांच्या मागणीच्या अंमलबजावणीवरुन जरांगे आक्रमक झाले. यात त्यांची जीभ घसरली. काल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आई-बहिण काढली.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना झालेल्या शिवीगाळ प्रकरणी जरांगेना विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले, आई – बहिणीवरून शिवीगाळ केली असेल असे मला वाटत नाही. पण कालची परिस्थिती वेगळी होती. रागाच्या भरात एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो. मात्र मी आई – बहिणीवरून बोललो नसेन. तरीही कोणाला काही असं मी बोललो असेल तर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागतो आणि दिलगीरी व्यक्त करतो, असे जरांगे म्हणाले.