पुणे, दि. २७ (पीसीबी) : पुणे लोकसभेवर वारंवार दावा सांगूनही उमेदवारी निश्चित होत नसलेले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये घुसमट होत असलेले तडफदार नेते वसंत मोरे यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. कात्रजच्या डेअरी संदर्भातल्या विषयासाठी ही भेट घेतल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकसंध राष्ट्रवादी असताना तत्कालिन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. आज कात्रज डेअरीचा विषय पुढे करून भेटीत काही राजकीय चर्चा झाली का? याविषयी राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू आहे. दरम्यान, मनसे मध्ये मोरे यांना कुठलेही स्थान उरलेले नाही आणि उमेदवारीची शक्यता नसल्याने त्यांनी पवार यांची भेट घेतल्याचे पुढे आले आहे.
अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्ह मिळविल्यानंतर शरद पवार यांच्यासमोर मोठं आव्हान उभे राहिले आहे. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उतरवून अजितदादा मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. याच अनुषंगाने शरद पवार देखील अजित पवार यांना प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाले असून विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी बोलावली होती. पुण्यातील निसर्ग कार्यालयात ही बैठक सुरू असताना वसंत मोरे यांची एन्ट्री झाली. मैदान वाचविण्यासाठी त्यांनी पवारांना साकडे घातलेय की बेरजेचे राजकारण? हा प्रश्नही राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय.
मी सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी आलो होतो. माझ्या प्रभागातील मैदानाचा प्रश्न प्रलंबित आहे, जो सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघात येतो. या प्रश्नासाठी मी आयुक्तांना देखील भेटलो आहे. पण प्रत्येक ठिकाणी भेटल्यानंतर या विषयात काहीतरी शिजतेय असे वाटत आहे. अधिकाऱ्यांवरती कुणीतरी मैदानाचे आरक्षण उठवण्यासाठी दबाव टाकत आहे. अजितदादांनी देखील हा विषय टाळला आहे. यासंदर्भात आमच्या खासदारांना (सुप्रिया सुळे) पत्र देण्यासाठी मी आलो होते, जे पत्र मी दोन महिन्यापासून तयार करून ठेवले होते. काल रात्री सुप्रियाताईंचा मला फोन आला. निसर्गला भेटायला या, असे त्यांनी मला सांगितलं. मला माहित नव्हतं या ठिकाणी मोठे साहेब देखील आहेत. त्यांचीही यानिमित्ताने भेट झाली.