- संजोग वाघेरे पाटील यांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) :- पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्रात लाखो नागरिक प्रामाणिकपणे दरवर्षी प्रॉपर्टी टॅक्स भरून शहराच्या विकासात योगदान देतात. अशा प्रामाणिक करदात्यांसाठी आणि नवीन करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्सनल अपघात पॉलिसी लागू करावी, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
या संदर्भात वाघेरे पाटील यांनी आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी नागरिकांकडून विविध कर आकारणी केली जाते. शहरांमध्ये अनेक मालमत्ता कर आकारला जातो, परंतु नागरिक नियमित मालमत्ता कर भरत नाहीत. त्यामुळे महानगरपालिकेचे अनेक वर्ष कर रूपाने पैसे वेळेत जमा होत नाहीत. तसेच महानगरपालिका हद्दीमध्ये अनेक ठिकाणी नवीन समाविष्ट गावांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामे, इमारती, व्यावसायिक इमारती तयार होत आहेत.
या नव्याने होणाऱ्या मालमत्तेचा कर वेळेत भरणे कामी प्रोत्साहन म्हणून पर्सनल अपघात पॉलिसी योजना (५,०००००/-) पाच लाख रुपया पर्यंत महानगरपालिके मार्फत राबवली जावी. य़ा योजनेचा लाभ हा महापालिका प्रशासन व शहरातील कर भरणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने हिताचा असून सदरील योजनेतून महापालिका प्रशासनाला प्रशासनाचा कर गोळा होण्यासाठी व संबंधित कर भरणाऱ्या नागरिकांना आकस्मित, अपरिहार्य घटनेत आर्थिक स्थर्य मिळविण्यासाठी लाभदायक ठरणार आहे, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
प्रतिक्रिया
कराचा भरणा करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनामार्फत कारवाई केली जाते. परंतु प्रामाणिकपणे कर भरणा-या नागरिकांना प्रोत्साहन देण्याकरिता महानगरपालिका काही ठोस उपाययोजना करत नाही. त्यासाठी दरवर्षी प्रॉपर्टी टॅक्स भरून शहराच्या विकासात योगदान देणा-या करदात्यांसाठी पर्सनल अपघात पॉलिसी लागू करावी. या पॉलिसीचा करदात्या नागरिकांना लाभ होईल आणि महानगरपालिकेच्या उत्पन्नात देखील भर पडेल.