मुंबई, दि. २३ (पीसीबी) : तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या किंवा त्याच शहरातील मूळ रहिवासी असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. याचा फटका मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी. वेलारासू या अधिकाऱ्यांना बसणार आहे. दरम्यान, बारा बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज दुपारी काढण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुका मुक्त आणि मोकळ्या तसेच पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणुक प्रक्रियेशी सबंधित महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार एकाच पदावर तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या किंवा गृह जिल्हा असलेल्या पोलीस दलातील आयुक्त, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपायुक्त आदी तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार अशा महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारकडून केल्या आहेत. हा नियम आतापर्यंत महापालिका आयुक्तांना लागू होत नव्हता. त्यानुसार महापालिका आयुक्तांना सरकारने अभय दिले होते.
अनेक आयुक्तांच्याही बदल्या
निवडणूक आयोगाने मात्र यंदा महापालिका आयुक्तांनाही हा बदल्यांचा नियम लागू केला असून या नियमांत बसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील आदेश निवडणूक आयोगाने आजच राज्य शासनास दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या आदेशाचा फटका मुंबई, पुणे आणि अकोला महापालिकांना बसणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भ़िडे व. पी. वेलारासू, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह अकोला व अन्य काही महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना बसणार आहे
.
बारा अधिकाऱ्यांच्या बदल्या –
- कविता द्विवेदी महापालिका आयुक्त, अकोला यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे या पदावर
- डॉक्टर हेमंत वसेकर आयुक्त, पशुसंवर्धन पुणे यांची नियुक्ती प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प पुणे या पदावर.
- श्री कौस्तुभ दिवेगावकर, प्रकल्प संचालक, स्मार्ट, पुणे यांची नियुक्ती आयुक्त, पशुसंवर्धन पुणे या पदावर
- श्री कार्तिकी एन एस यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे या पदावर
- श्री मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई या पदावर
- श्री एम जे प्रदीप चंद्र यांचे नियुक्ती अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय मुंबई या पदावर
- श्रीमती कावली मेघना यांची, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट या पदावर.
- श्री विजय सिंगल महाव्यवस्थापक, बेस्ट यांची नियुक्ती उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको मुंबई या पदावर
- श्री संजय सेठी यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव, परिवहन व बंदरे या पदावर
- श्री पराग जैन नैनोटिया, प्रधान सचिव (परिवहन व बंदरे) यांची नियुक्ती प्रधान सचिव, (माहिती तंत्रज्ञान) सामान्य प्रशासन विभाग, मुंबई या पदावर
- श्री ओ पी गुप्ता अप्पर मुख्य सचिव (व्यय) वित्त विभाग यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग या पदावर
- श्री राजेश कुमार यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग या पदावर