मंचर, दि. २२ (पीसीबी) – शरद पवारांनी आज थेट मानसपुत्र दिलीप वळसे पाटलांवर तोफ डागली. शरद पवारांची वळसे पाटलांच्या आंबेगाव मतदारसंघात मंचरमध्ये सभा झाली. ‘महासभा एकजुटीची’ या जाहीर सभेतून वळसे पाटलांचा पराभव करा, असं आवाहन यावेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केलं. राष्ट्रवादी अजित पवार गटाविरोधात शरद पवारांनी दंड थोपटले आहेत. त्यात पहिला नंबर वळसे पाटलांचा लागला आहे.
जुन्नर, आंबेगाव, इंदापूरसह इतर ठिकाणच्या मागच्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना यश आले. या उमेदवारांनी कुणाच्या नावाने निवडणूक लढवली? कुणाचा फोटो त्यांनी निवडणुकीत वापरला? हे सगळं माहिती असताना आज कुठूनतरी भीती आणि दामदाटी करण्यात आली. तुरुंगात टाकण्याची धमकी आली. त्यामुळे अनेकजण पक्ष सोडून दुसऱ्या बाजूला गेलेत. म्हणून आज आपल्याला जागं व्हावं लागेल, असं शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर आंबेगावमधील शरद पवारांची ही पहिलीच सभा होती. पवारांनी या सभेत दिलीप वळसे पाटलांना फैलावर घेतलं. पुढील दोन महिने आम्ही पिंजून काढू. निष्ठवंतांना निवडून आणू, तुम्हीही निष्ठवंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, हीच अपेक्षा मी व्यक्त करतो, असं आवाहन पवारांनी केलं. या तालुक्यातील एका बाजूला निष्ठवंत सहकाऱ्यांनी जन्मभर साथ दिली. पण आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी काय केलं? असं म्हणत पवारांनी वळसे पाटलांवर निशाणा साधला.
अनेकांनी प्रामाणिकपणे काम केलं, ते हयात नाहीत. निष्ठा हे त्याचं वैशिष्ट्य होतं. पण आज आपण काय पाहतो? आम्ही त्यांना सगळं दिलं. विधानसभा, मंत्री, विधानसभा अध्यक्षपद, साखर कारखान्यांचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं. पण त्यांनी पाच टक्केही निष्ठा पाळली नाही. ते निघून गेले. मग ते मतदारांशी काय निष्ठा राखतील. आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असं म्हणत शरद पवारांनी वळसे पाटलांचा पराभव करण्याचं आवाहन केलं.