बारामती, दि. २१ (पीसीबी) : पवार कुटुंबातून आज आणखी एक पवार सक्रीय राजकारणात उतरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. युगेंद्र पवार यांचा अजून राजकारणात अधिकृत प्रवेश झालेला नाही. पण युगेंद्र पवार यांचा कल शरद पवार गटाकडे आहे. हा अजित पवार गटासाठी एक धक्का मानला जातोय. कारण युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत. आज युगेंद्र पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर दिली. पुढच्या काही दिवसात बारामतीच्या राजकारणात पवार विरुद्ध पवार हा संघर्ष पहायला मिळू शकतो. “पूर्वीपासून सामाजिक काम करत आलोय. इथे उपस्थित असलेले अनेक सहकारी पूर्वीपासून माझ्यासोबत काम करतायत. त्यांच्या विनंतीला मान देऊन इथे आलोय” असं युगेंद्र पवार म्हणाले.
“मी आधी मुंबईत होतो. नंतर पुण्यात होतो. काही वर्ष पुण्यात शिक्षण घेतलं, त्यानंतर दोन-तीन वर्ष युरोपला गेलो. अमेरिकेला गेलो, सात-आठ वर्ष बाहेर होतो. कोणाला वाटल नव्हतं, मी परत येईन” असं युगेंद्र पवार म्हणाले. “मी परत आलो, मुंबईत व्यवसाय बघितला. शरयू म्हणून एक ग्रुप आहे. चार वर्षापूर्वी साहेबांनी माझी विद्या प्रतिष्ठानवर निवड केली. दर आठवड्याला मी मीटिंगसाठी येतो” असं युगेंद्र पवार म्हणाले.
सुप्रिया सुळेंच्या प्रचाराबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘मला सुद्धा सुप्रिया सुळेंचा प्रचार करायला आनंद होईल’. “शरद पवार माझ्यासाठी साहेब आहेत, मी त्यांचा खूप आदर करतो. त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. मी खूप छोटा आहे. ते माझ्याबद्दल बोलले खूप चांगलं वाटलं. लोकसभा निवडणुकीत जर साहेबांनी सांगितला, प्रचार करीन. साहेब म्हणतील तसं” असं सूचक विधान युगेंद्र पवार यांनी केलं.
राजकीय प्रवेशाची इच्छा व्यक्त
अजित पवार म्हणाले होते की, कुटुंबात त्यांना एकट पाडलं जाईल. या प्रश्नावर युगेंद्र पवार म्हणाले की, “मला असं वाटत नाही. कुटुंब फुटलय, अजितदादांना एकट पाडलं जातय असं मला वाटत नाही, कुटुंब एकच आहे. कुटुंब वेगळ ठेवलं पाहिजे” “कुटुंबात मी छोटा माणूस आहे. मी आज फक्त कार्यालय बघायला आलोय” असं ते म्हणाले. राजकारणात येण्याची इच्छा देखील युगेंद्र पवार यांनी बोलून दाखवली. “मला खालून वर जायला आवडेल. मी तळागाळात काम करतो. वरती जाण्यासाठी तळागाळातील अनुभव महत्त्वाचा आहे” असं ते म्हणाले.