जम्मू काश्मीर हादरले, ५.२ रिस्टर स्केलचा भूकंप

0
258

काश्मिर, दि. २० (पीसीबी) : देशाचा केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाख आणि जम्मू काश्मीरचा मोठा परिसर सोमवारी रात्री भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. अचानक आलेलल्या या भूकंपामुळे नागरिक घाबरून घराच्या बाहेर आले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ५.२ रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलच्या उत्तर-पश्चिमेस १४८ किलोमीटर अंतरावर होता. हे धक्के रात्री ९.३५ च्या सुमारास बसले. तर भूकंपाची खोली भूपृष्ठापासून १० किलोमीटर खाली होती.

जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी सुरू आहे. नागरिक आपल्या घरतात असतांना रात्री ९.३५ च्या सुमारास जमिनीला मोठे हादरे बसू लागले. अचानक आलेल्या भूकंपामुळे नागरिक घाबरले. बाहेर थंडी असतांना देखील नागरिक घराबाहेर पळत सुटले. श्रीनगरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी शुक्रवारी देखील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. भूकंपकाकावर याची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल एवढी होती. तर सोमवारी रात्री झालेल्या भूकंपाची तीव्रता ही ५.२ रिश्टर स्केल एवढी होती.

१३ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात ३.४ तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू जमिनीत ५ किमी खोलीवर होता. यापूर्वी ४ जानेवारीलाही जम्मू-काश्मीरमध्ये ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.