बारामती, दि. १८ (पीसीबी) : ‘‘पवार कुटुंबात मी एकटा आहे, असे अजित पवार सांगत असतील तर लोकांची सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. काही कार्यकर्त्यांना फोन येतात, दमदाटी केली जाते. बारामतीत ज्या गोष्टी कधीच नव्हत्या, त्या यंदा पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत’’, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार बारामतीत माध्यमांशी बोलत होते. लोकसभेला यश नाही आले तर विधानसभा निवडणूक लढविणार नाही, या अजित पवार यांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, ‘‘हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. भावनात्मक अपील आमच्याकडून करण्याचे काही कारण नाही. बारामती मतदारसंघातील लोक आम्हाला वर्षानुवर्षे ओळखतात. पण, ज्या पद्धतीने विरोधकांकडून भूमिका मांडली जाते, त्यांची भाषणे काहीतरी वेगळेच सुचवत आहेत. त्याची नोंद बारामतीचा मतदार निश्चित घेईल व योग्य तो निर्णय घेईल.’’
जितेंद्र आव्हाड यांनी दोन्ही पवारांमध्ये भांडणे लावली, या धनंजय मुंडे यांच्या आरोपाचे शरद पवार यांनी खंडन केले. ते म्हणाले, ‘‘धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत जितका काळ घालवला, त्याहून अधिक काळ आव्हाड हे पक्षासाठी कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रीय व राज्य पातळीवर काम केले आहे. पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी वेगळी भूमिका घेतली, असं नाही, जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं, हे अन्य लोकांनी सांगण्याची आवश्यकता नाही.’’
‘‘मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती उत्तम राहावी, असे आम्हा लोकांना वाटते. त्यांनी उपोषणाचा मार्ग सोडून प्रश्न सोडविण्यासाठी विचारविनिमयाचा मार्ग शक्य आहे का, हे जरूर पाहावे. लोकांची सहानुभूती त्यांना आहे. प्रश्न सुटावा, असे लोकांनाही वाटते. त्यासाठी राज्य सरकारनेही समंजसपणाची भूमिका घ्यावी,’’ असे आवाहन शरद पवार यांनी केले. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार विशेष अधिवेशनात नेमका काय प्रस्ताव आणणार आहे, हे स्पष्ट झाल्याशिवाय याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला.
सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांच्यात बारामती लोकसभा मतदार संघातील संभाव्य लढतीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, ‘‘लोकशाहीत निवडणूक लढविण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. याबाबत तक्रार करायचे कारण नाही. आम्ही आमची भूमिका लोकांसमोर मांडू. गेली पन्नास वर्षे आम्ही काय काम केले, हे लोकांना माहिती आहे. विद्या प्रतिष्ठान किंवा कृषी विकास प्रतिष्ठान केव्हा स्थापन झाले, आज आरोप करणारे त्या वेळी काय वयाचे होते? निवडणुकीला उभे राहण्याचा त्यांना अधिकार आहे.’’