तो स्वस्तात परत गेला, पुणे भाजपचं काम अपूर्ण …

0
222

पुणे, दि. १३ (पीसीबी) – ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी समर्थन केले. वागळे कुणी पत्रकार नाही. तो स्वस्तात परत गेला, पुणे भाजपचं काम अपूर्ण असून ते त्यांनी पूर्ण करावं, नाहीतर मला बोलवा, अशी धमकीच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली.

भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम राणे यांच्या उपस्थितीत झाला. वागळे यांचा एकेरी उल्लेख करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पुण्यात कार्यक्रम केला हे योग्यच केले. त्याला पत्रकार म्हणून तुम्ही स्वतःचा अपमान करून घेऊ नका. ती विकृती आहे, असे म्हणत सिंधुदुर्गात आल्यानंतर त्याचा योग्य तो समाचार घेणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना राणे म्हणाले, भाजपमध्ये यावे यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता. विरोधक त्यांच्या नेत्यांची काळजी घेत नाहीत. त्यामुळे नेते असे निर्णय घेत आहेत. भाजपशिवाय पर्याय नाही, याची जाणीव त्यांना झाली असावी. कोणत्या पक्षात भवितव्य आहे, हे ओळखूनच त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होत असावा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुंडासमवेतची संजय राऊत यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेले फोटो, मराठा आरक्षण, यावर त्यांनी भाष्य केले. ‘जे नेते भाजपमध्ये येत आहेत. ती काही लहान मुले नाहीत. जे नेते येत आहेत, त्याची कारणे वेगवेगळी आहेत. चव्हाण यांच्यावर कोणताही दबाव नव्हता. काँग्रेस सोडताना आमचीही कारणे वेगळी होती.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 हून अधिक जागा मिळतील. या निवडणुकीनंतर उद्ध‌व ठाकरे मातोश्रीवर असतील की जेलमध्ये हे दिसेल. ठाकरे यांनी भाजपची चिंता करण्याएवेजी स्वत:ची आणि मुलाची काळजी करावी. महाविकास आघाडीची वाट लागली आहे.

संजय राऊत जेथे जातात, तेथे कामय अशीच परिस्थिती होते. आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस त्यांनी संपविली आहे. संजय राऊत यांच्या छायाचित्राचा संग्रह आमच्याकडे आहे. तो बाहेर काढला तर अनर्थ होईल, असे राणे म्हणाले.