“आता राजकीय भूकंप नव्हे तर त्सुनामी येणार“, अशोक चव्हाण अमित शाह यांच्या उपस्थिती कऱणार भाजप पक्षप्रवेश?

0
248

जळगाव, दि. १२ (पीसीबी) – काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आमदारकीचादेखील राजीनामा दिला आहे. त्यांच्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याबाबत भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं सूचक वक्तव्य केलं आहे. “आता राजकीय भूकंप नव्हे तर त्सुनामी येणार असेल. कारण अनेक नेत्यांना त्यांच्या पक्षात सर्वत्र अंधार दिसतो आहे. त्यामुळे अनेकांचा ओढा हा भाजपकडे आहे. थोड्या दिवसात आपल्याला चमत्कार दिसतील”, असं सूतोवाच मंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशावर बोलताना केलं आहे.

“अनेक मोठे राजकीय भूकंप होणार आहेत. त्याबद्दल मी स्वतः अंदाज वर्तवले होते आणि ते आता व्हायला लागले आहेत. त्यामुळे आता समोर कोण राहील, हे मला माहीत नाही”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. “अशोक चव्हाण यांच्याबाबत मला काही माहिती नाही. मात्र थोड्या वेळाने काय-काय होतं हे आपल्याला दिसेल. इतर पक्षांतील खूप लोकांचा ओढा हा भाजपकडे आहे. त्यामुळे देशात 400 पार जागा करून मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. त्यामुळे यासाठी प्रत्येकाला आपला सहभाग असावा असं वाटत आहे”, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली.

अमित शहा 15 फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अमित शाह यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा जळगावात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल का? असा प्रश्न गिरीश महाजन यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “जळगावमध्ये युवा संमेलन आहे. अमित शाह या कार्यक्रमात युवा वर्गाशी संवाद साधणार आहेत. यात 18 ते 30 वयोगटातील 30 ते 40 हजार तरुणांचा सहभाग असणार आहे. अतिशय मोठा कार्यक्रम होणार आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले. “या कार्यक्रमात कुठलेही राजकीय प्रवेश नाही”, असंही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.

“जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या ठिकाणी दोन्ही खासदार असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, सर्व ठिकाणी भाजपचाच बोलबाला राहिलेला आहे. जिल्ह्यात कोणी राहिलेलं नाही. रावेर वगळता सर्व ठिकाणी महायुतीचे तिन्ही पक्षाचे आमदार आहेत. त्याचमुळे अमित शहा हे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात येत असल्याने मोठा उत्साह या ठिकाणच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. तसाच मोठा जोश तरुणांमध्ये आहे”, असं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.