पुणे, दि. ११ (पीसीबी) -विमानतळावर आलेले गिफ्ट सोडवून घेण्याच्या बहाण्याने एका टोळक्याने व्यक्तीची 23 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 11 नोव्हेंबर 2023 ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत बावधन, पुणे येथे घडला.
केदार चंद्रशेखर मोहिरे (वय 33, रा. बावधन, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. प्रीटी जॉन्सन, मिस्टर पाल मार्क, मिसेस लक्ष्मी भाटीया, अनुप कुमार, अभिजित मोंडल, हरून रशीद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फुरसुंगी येथील एका कंपनीत काम करत असताना त्यांची आरोपी डॉ. प्रीटी जॉन्सन हिच्याशी ओळख झाली. त्यानंतर तिने केदार यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. केदार यांनी रिक्वेस्ट स्वीकारली. तिथून तिने केदार यांचा व्हाटसअप नंबर घेतला. त्यानंतर तिने केदार यांना गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले. गिफ्ट पाठवण्याचे कारण विचारले असता डॉ. प्रीटी हिने, तिला भारतात हॉस्पिटल प्रकल्प सुरु करायचा असून त्यासाठी केदार यांची मदत लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर केदार यांना पाठवलेले गिफ्ट विमानतळावर आले असल्याचे सांगून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस घेऊन त्यांची 23 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.