पिंपरी, दि. ८ (पीसीबी) प्रत्येकाने आपल्या हृदयातील नाजूक कप्प्यात प्रेयसीची आवडती प्रतिमा चिरंतन जपलेली असते. अशीच ‘प्रेयसी’ सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी त्यांच्या कल्पनेतून आणि कॅमेरातून टिपली आहे. ही प्रेयसी आणि निसर्ग यांचं नातं छायाचित्र प्रदर्शनातून कला रसिक प्रेक्षकांसाठी सादर केले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सोमवारी (दि.१२ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता, या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गीतकार, कवी गुरु ठाकूर यांचे हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक महेश कुडाळकर, जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत. बुधवार (दि.१४ फेब्रुवारी) पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्व कला रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधी छायाचित्रकार कशाळीकर यांनी उपलब्ध करून दिली आहे. चेहऱ्याच्या पलीकडे जाऊन पण सौंदर्य आणि सृजनाची एक परिभाषा आहे अशा पाहताक्षणीच मनाला भुरळ घालणाऱ्या या छायाचित्रांना सुप्रसिद्ध गीतकार, कवी गुरु ठाकूर यांनी
“अशी चढती दुपार
सखे सांभाळ पदर
तुझ्या गजऱ्याने दिली
उभ्या रानाला खबर “
“नको उधळत जाऊ
असा रूपाचा कहर
तुझ्या पाठीला खिळली
उभ्या रानाची नजर”
असा शब्द साज चढविला आहे.या ‘प्रेयसी’ चा मागोवा घेण्यासाठी देशभरातील विविध राज्यात विशेषतः महाराष्ट्र सह लडाख, कर्नाटक, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन थंडी, ऊन, वारा, पाऊस अगांवर झेलत छायाचित्रे घेतली आहेत. स्पेशल आरकईव्ह अशा कॅनव्हास वर सप्तरंगाची मुक्त उधळण करीत अतिशय सुंदर कलाविष्कार असणारी ६० पेक्षा जास्त छायाचित्र या प्रदर्शनात पाहण्यास मिळणार आहेत. सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्या विषयी सांगायचे झाले तर, हा हरहुन्नरी, प्रयोगशील कलाकार भारत सरकार चा युवक कल्याण मंत्रालयचा पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार प्राप्त पुणे जिल्ह्यातील फोटोग्राफर आहे. तसेच निकॉन पुरस्कार, कॅनन पुरस्कार, जगदीश खेबूडकर पुरस्कार, मोरया पुरस्कार, टाइम्स ऑफ इंडिया पुरस्कार, वसुंधरा फिल्म पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने त्यांच्या कलेचा गौरव करण्यात आला आहे. मागील २८ पेक्षा जास्त वर्षे फोटोग्राफी क्षेत्रात कामकाज, पिंपरी चिंचवड महानगपालिका आस्थापनेवरील प्रसिद्धी विभागासाठी २० वर्षे काम केले आहे.आजवर महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर अनेक विषयावर फोटोग्राफी प्रदर्शने आयोजित केली आहे. सध्या डॉक्यूमेण्ट्री, फिल्म मेकिंग प्रकारात कार्यरत आहेत. अनेक नामवंत वृत्तसंस्था, नामांकित चॅनल साठी फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करत आहेत. अतुल्य भारत या विषयावर पूर्ण भारताचे सांस्कृतिक चित्रीकरण करण्याचा त्यांचा प्रकल्प सुरू आहे.