लोकसभेच्या ४८ पैकी मविआला २६ , तर २२ जागांवर महायुतीला

0
244

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) : देशात येत्या काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी इंडिया टुडे आणि सी व्होटरनं ‘देशाचा मूड काय?’ हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमधून संभाव्य निकाल आश्चर्यकारक असतील अशी माहिती समोर आली आहे. या सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही फडणवीस-शिंदे-अजितदादा यांच्या महायुतीवर भारी पडताना दिसत आहे.

महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभेच्या जागांपैकी मविआला २६ जागांवर विजय मिळेल तर उर्वरित २२ जागांवर महायुतीला समाधान मानावं लागेल, असं चित्र आहे. तसेच महायुतीला महाराष्ट्रात ४०.५ टक्के मतं तर महाविकास आघाडीला ४४.५ टक्के मतं मिळतील असं दिसत आहे. त्यातही महायुतीतील तिन्ही पक्षांचे मिळून २२ तर महाविकास आघाडीतील काँग्रेसला १२, ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी १४ जागा मिळतील असाही अंदाज आहे.

गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएनं ४१ जागा जिंकल्या होत्या. यामध्ये २२ भाजपला तर १९ जागांवर शिवसेनेचे खासदार निवडणून आले होते. त्यावेळी शिवसेनेत फूट पडली नव्हती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूक लढवली होती. त्यांना केवळ ६ जागांवर विजय मिळाला होता. यांपैकी राष्ट्रवादीला ४ तर काँग्रेसला एकच जागा मिळाली होती. तर औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी विजय मिळेल.