नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या नवीन मी राष्ट्रवादी काँँग्रेस पक्ष असे नाव मिळाले असून उगवता सुर्य असे चिन्ह देण्यात आले आहे, असे सुत्रांनी सांगितले.
जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीबरोबर जात उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. त्यांच्याबरोबर काही आमदारही गेले. तसंच, जवळपास ७ मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथही घेतली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले. गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचं प्रकरण प्रलंबित होतं. गेल्या सहा महिन्यांत याप्रकरणी १० सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्या. या प्रत्येक सुनावणीत शरद पवार जातीने हजर होते.
अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आगोयाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. अखेर अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि पक्षनाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.