निवडणुकीच्या वेळी गुंडांना तुरुंगातून सोडलं, दानवेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

0
101

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) — सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. जर आरक्षणावर तोडगा निघाला तर मग मनोज जरांगे यांना पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ का येत आहे. पोलिस ठाण्यात भाजप आमदाराने गोळीबार केला. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था नाही, अशी टीका विरोधीपक्षांकडून केली जात आहे. गोळीबार ज्याच्यावर झाला तो महेश गायकवाड हा शिंदे गटातील असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे विरोधकांच्या रडारवर आहेत. शिंदेंच्या काळात गुंडगिरी वाढली, असा जाहीर आरोप संजय राऊत करत आहेत. आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या वेळी गुंडाना जेलमधून सोडण्यात आल्याचा गंभीर आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोटनिवडणुकी वेळी तुरुंगातून अनेक गुंडांना सोडवण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी भेटीगाठी घेतल्या. याची माहिती आमच्याकडे आहे. त्या गुंडांची चौकशी झाली पाहिजे. सर्रास या गुंडाचा वापर निवडणुकीत होतो. सर्वसामान्य जनतेच्या मनात धाक निर्माण करायचा आणि राजकीय हित साधायचे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

आरक्षणावरून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. जर आरक्षणावर तोडगा निघाला तर मग मनोज जरांगे यांना पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ का येत आहे.सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. मराठा-ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे देखील दानवे यांनी सांगितले. छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. पण त्यांना पक्षाने सोडलेलं आहे, हे कळतंय, असा टोला देखील दानवे यांनी लगावला.

कायद्याचा धाक राहिला नाही
गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा वचक राहिला नाही. महाराष्ट्रात फडणवीस यांच्या कायदा सुव्यवस्थेवर धाक राहिला नाही. केवळ राजकारणात गुंतलेले आहेत. भाजप आमदारच गोळीबार करतोय. ज्याला गोळ्या घातल्यात तोही धुतल्या तांदळाचा नाही. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र हे वर्ष बंगल्यावर पुण्यातील कुख्यात गुंडा भेटतात, तेच उत्तर देतील