विकसित भारत संकल्प यात्रेचा २१ दिवसांचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू

0
250

पिंपरी, दि.४ ((पीसीबी) – महाराष्ट्र नियोजन विभागाकडील सूचनेनुसार पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील विकसित भारत संकल्प यात्रेचा २१ दिवसांचा दुसरा टप्पा उद्या सोमवार ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. केंद्र शासन पुरस्कृत योजनांची परिपूर्णता साध्य करण्यासाठी ५ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत “विकसित भारत संकल्प यात्रा” चे आयोजन करण्यात आले असून विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत केंद्र शासनाच्या विविध योजना पोहोचतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ वाहनाचे उद्घाटन सोमवार दि.५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी नगरसदस्य, नगरसदस्या यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

‍नगर विकास विभागाकडून केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी), प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), स्वच्छ भारत अभियान (नागरी), प्रधानमंत्री ई- बस, सेवा व अमृत योजना यांसह अनेक योजना राबविल्या जातात,या प्रधानमंत्री महत्वाकांक्षी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी योजनांबाबतची जनजागृती करून योजनेची परिपूर्णता साध्य करण्यासाठी ५ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत “विकसीत भारत संकल्प यात्रा” चे आयोजन करणेबाबत केंद्र व राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत.

सदर वाहन यात्रा उद्यापासून मनपाच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गंत ४२ ठिकाणी काढण्यात येणार आहे. सदर यात्रेद्वारे योजनांच्या लाभार्थ्यांची ऑनबोर्डिंग करणे, पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करणे, त्यांचा तपशील आधार कार्डसह एकत्रित करणे, लाभार्थ्यांना योजनांशी जोडणी करणे यासह इतर योजनांसाठी महापालिका अधिकारी, कर्मचा-यांच्या सहकार्यातून मोहिम राबण्यात येईल असे आयुक्त सिंह यांनी सांगितले.