पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा समाजाचे १०० टक्के सर्वेक्षण पूर्ण

0
213

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल सहा लाख घरांना भेटी देऊन मराठा समाजाचे १०० टक्के सर्वेक्षण शुक्रवारी (दि.२) पूर्ण करण्यात आले. त्या संदर्भातील अहवाल आज शनिवारी (दि.३) सकाळी मागासवर्गीय आयोगास पाठविला जाणार आहे. मराठा, मराठा-कुणबी, कुणबी- मराठा या समाजाचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवार (दि. २३ जानेवारी) पासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले होती. त्यासाठी महापालिकेने १ हजार ९७४ प्रगणक नेमले होते. त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाचे मोबाईल अॅपवर ऑनलाईन सर्वेक्षण केले. तसेच, एकूण १२७ पर्यवेक्षक, ८ क्षेत्रीय अधिकारी, ८ प्रशासन अधिकारी, १६ लिपिक, निवडणूक विभागाच्या १० कर्मचारी हे काम पूर्ण केले. असे एकूण २ हजार १४४ कर्मचाऱ्यांनी हे काम पूर्ण केले.

सर्वेक्षणास शुक्रवारी रात्री १२ पर्यंत मुदत होती. एकूण ११ दिवसांत हे सर्वेक्षण करण्यात आले. सुटीच्या दिवसांतही कर्मचाऱ्यांनी घरोघर जाऊन नोंदणीचे काम केले. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात आला नाही. काहींनी माहिती देण्यास नकार दिला. काही घरांना कुलूप होते. त्या ठिकाणीही सर्वेक्षण करण्यात आले. ज्या घरांत कोणी भेटले नाही आणि ज्यांनी नकार दिला, तशी नोंद घेण्यात आली आहे.

सर्वेक्षणाचा संपूर्ण डाटा मागासवर्गीय आयोगाकडे जमा होणार..
महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह या सर्वेक्षणाचे नोडल ऑफिसर होते. तर, मी सहायक नोडल ऑफिसर म्हणून काम पार पाडले. नेमून दिलेल्या विभागात प्रगणकांनी घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेतली. शहरातील एकूण ६ लाख घरांना भेटी देऊन त्यांच्याकडून माहिती अॅपवर नोंदविण्यात आली. हे अॅप मागासवर्गीय आयोगाकडून देण्यात आले होते. तो संपूर्ण डाटा थेट त्यांच्याकडे जमा झाला आहे. त्याचा तपशील महापालिकेकडे उपलब्ध नाही. शहरात १०० टक्के सर्वेक्षण झाल्याचा अहवाल शनिवारी (दि. ३) सकाळी मागासवर्गीय आयोगास पाठविला जाणार आहे, असे महापालिकेचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.