पिंपरी, दि. १ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन निषेध केला. पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दोन तास ठिय्या मांडून या चौकशीप्रकरणी सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत लढत आहेत आणि त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे आमदार रोहित पवार हे आहे. ते आपले आजोबा शरद पवार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी फुटीर गटाविरोधात राज्यभरात रान पेटवले आहे आणि राज्यातील सामान्य नागरीक, विद्यार्थी, युवा, शेतकरी, महिला यांच्या मुद्द्यांवरही ते सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करत आहेत. केवळ आपल्या मतदारसंघापुरतेच मुद्दे ते मांडत नाहीत तर राज्यातील विविध घटकांचे मुद्दे ते आक्रमकपणे मांडत आहेत. आमदार म्हणून विधानसभेत आणि रस्त्यावरची लढाईही आमदार रोहित पवार हे लढत असल्याचे दिसते. राज्यातील युवांच्या प्रश्नावर नुकतीच त्यांनी पुणे ते नागपूर अशी तब्बल ८०० कि.मी. हून अधिक लांबीची युवा संघर्ष यात्रा काढून त्याकडे सरकारचे लक्ष वेधलेच पण सोबतच शेतकरी, महिला, कामगार, बेरोजगार यांचे मुद्देही आक्रमकपणे मांडले. युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला तर त्यांचा आक्रमकपणा आणि त्यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद संपूर्ण राज्याला बघायला मिळाला.
पक्षातील पहिल्या फळीतील अनेक नेते सत्तेत सहभागी झाले असले तरी आमदार रोहित पवार हे न डगमगता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाची भूमिका ठामपणे आणि मुद्देसूदपणे मांडत आहेत. यामुळेच घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लावला आहे. यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा बडगा उगारून पाहिला तरी आमदार रोहित पवार यांनी या कारवाईला जुमानले नाही. त्यानंतर युवा संघर्ष यात्रा काढून राज्यभर सरकारविरोधात वातावरणनिर्मिती केली. त्यामुळेच लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या या युवा नेत्याला रोखण्यासाठी सरकारकडून सूडाची कारवाई केली जात असून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लावल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्याविरोधात कारवाई केली जात असेल आणि त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते धोकादायक आहे.
आज आमदार रोहित पवार यांची चौकशी ज्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकारणावरून केली जात आहे त्या राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळांची यादी पाहीली तर त्यापैकी अनेकजण आज भाजपमध्ये किंवा अजित पवार गटामध्ये किंवा शिंदे गटामध्ये आहेत. त्यात स्वतः अजित पवार यांच्यासह अमरसिंह पंडीत, सुनील फुंदे, नितीन पाटील, माणिकराव कोकाटे, रामप्रसाद बोर्डीकर, शेखर निकम, विजयसिंह मोहिते पाटील, राजन तेली, दिलीपराव सोपल, आनंदराव अडसूळ, धनंजय दलाल यांचा समावेश आहे. शिवाय या बरखास्त संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल असून यामध्ये रोहित पवार यांचा काहीही संबंध नाही. परंतु या सर्वांभोवती सत्तेचे कवच असल्याने त्यांची कोणतीही चौकशी केली जात नाही परंतु आमदार रोहित पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांची मात्र चौकशी केली जात असून ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ देण्याचा हा प्रकार आहे. तसेच नाबार्डचा अहवाल आणि उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेनुसार दाखल झालेला गुन्हा हा २०१० चा असून आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने कन्नड येथील साखर कारखाना हा २०१२ साली लिलावामध्ये ५०.२० कोटी इतकी सर्वाधिक बोली लावून खरेदी केलेला आहे. त्यामुळे राज्य बँकेकडून बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात आमदार रोहित पवार यांचा दुरान्वयेही संबंध नाही. शिवाय २०१९ मध्ये ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात कोणताही बेकायदेशीर व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे हा तपासही बंद करण्यात आला आहे. परंतु केवळ त्रास देण्याच्या हेतूनेच या सरकारकडून आमदार रोहित पवार यांची चौकशी करत असून लोकांचे प्रश्न विचारणाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे. याविरोधातच हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी आक्रमकपणे सरकारविरोधात घोषणाबाजी निषेध केला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष तुषार कामठे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व सामान्य नागरीक सहभागी झाले होते.
चौकट
‘‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामान्य लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. आमदार रोहितदादा पवार हेही आदरणीय शरद पवार साहेबांसोबत महाराष्ट्र धर्माच्या विचारांसाठी लढत आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर आकसाने कारवाई केली जात असून ती अन्यायकारक आहे. या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतो. सरकारने कितीही त्रास दिला तरी आम्ही त्यांना शरण जाणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत घाबरून भाजपसोबत पळूनही जाणार नाही तर कठोर संघर्ष करू, लढू आणि जिंकू असे शहर अध्यक्ष तुषार कामठे म्हणाले.
यावेळी कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, महिला अध्यक्षा ज्योतीताई निंबाळकर, युवक अध्यक्ष इमरान शेख, सरचिटणीस शकुंतला भाट, नेते गणेश भोंडवे, सुलक्षणाताई धर, ज्येष्ठ नेते शिरीष जाधव, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे माजी उपमहापौर विश्रांती ताई पाडळे, उद्योग आणि व्यापार सेलचे अध्यक्ष विजयकुमार पिरंगुटे, सामाजिक न्याय अध्यक्ष मयूर जाधव, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ, अल्पसंख्यांक अध्यक्ष अल्ताफ शेख, कामगार आघाडीचे अध्यक्ष संदीप शिंदे, ओबीसी सेल अध्यक्ष विशाल जाधव,संघटक राजू खंडागळे,विवेक विधाते,संदीप गायकवाड,सचिव योगेश सोनवणे,ग्राहक सेल अध्यक्ष संजय पडवळ,संतोष माळी, धुमाळ, गणेश भांडवलकर, बापू सोनवणे, राजरत्न शीलवंत, स्वप्नाली असोले, कैलास बनसोडे, अविनाश कांबळे आदी उपस्तिथ होते