देहू-आळंदी-चाकण-खेड मिळून तिसरी महापालिका लवकरच होणार

0
184

पुणे, दि. ३० (पीसीबी) : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये लगतच्या गावांचा समावेश होत असून दिवसेंदिवस हद्दवाढ होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे उरुळी देवाची आणि फुरुसुंगी या गावांनी पुणे महानगरपालिकेमधून स्वतंत्र होऊन स्वतंत्र नगरपरिषद स्थापनेसाठीचे प्रयत्न सुरू ठेवले आहे, तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत नवीन गावांचा समावेश करणे योग्य होणार नाही. त्यामुळे चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर या नगरपरिषदांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महानगरपालिका निर्माण करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. याबाबत राजकीय पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि स्थानिकांनी मागील आठ वर्षांपासून केलेल्या मागणीवर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.

खेड तालुक्यातील या तिन्ही नगरपरिषद तसेच लगतच्या परिसरातील आसपासच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द इत्यादी तपशील विभागीय आयुक्त राव यांनी मागविला आहे. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तिन्ही नगरपरिषदांचे मुख्याधिकारी आणि पीएमआरडीए महानगर आयुक्तांना सविस्तर अहवाल करून अभिप्राय मागविले आहेत. येत्या फेब्रुवारी अखेरपर्यंत अभिप्राय प्राप्त होणार आहे. याबाबत तिन्ही नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून देखील स्वतंत्र पत्र पाठविण्यात आले असून त्याबाबत वेळोवेळी माहिती घेण्यात येत असल्याची माहिती नगरपालिका शाखेचे सहआयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली.

दरम्यान, राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांचा होणारा विस्तार पाहता खेड तालुक्यातील चाकण, राजगुरूनगर आणि आळंदी या नगरपरिषदा आणि लगतच्या गावांची मिळून एक स्वतंत्र महापालिका करण्याबाबत माहिती मागविण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित भागातील भौगोलिक पातळीवर चतु:सीमा, हद्द, क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि तेथील विस्तार आदी माहिती मागविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, तिन्ही नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांना पत्र पाठवून अभिप्राय मागविण्यात आले आहे. सर्व विभागांचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर स्वतंत्र अहवाल तयार करून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.