तळेगाव दाभाडे, दि. ३० (पीसीबी) – तिकीटाच्या सुट्या पैशांवरून प्रवासी महिला आणि पीएमपी बस चालक व वाहकामध्ये बाचाबाची झाली. चालक आणि वाहकाने इतर प्रवाशांना उतरवून संबंधित महिलेला डेपो मध्ये नेण्याचा प्रयत्न केला असता महिलेने नातेवाईकांना फोन करून स्वतःची सुटका करून घेतली. ही घटना रविवारी (दि. 28) तळेगाव स्टेशन चौक परिसरात घडली. याप्रकरणी बस चालक आणि वाहक या दोघांना अटक करण्यात आली आहे.
नवनाथ व्यंकटराव ढगे (वय 28, रा. चिखली), मुजा गणपती लुट्टे (वय 30, रा. निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने सोमवारी (दि. 29) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या तळेगाव स्टेशन पासून निगडीकडे जाणाऱ्या बसमध्ये चढल्या. त्यांच्या प्रवासासाठी पाच रुपये तिकीट आवश्यक होते. मात्र महिलेने 500 रुपयांची नोट दिली. सुट्या पैशावरून प्रवासी महिला आणि वाहक यांच्यात शाब्दिक वाद झाला. दरम्यान वाहकाने महिलेची मोबाईलमध्ये शुटींग केली. त्याबाबत महिलेने वाहकाला हटकले असता आरोपी त्यांच्या अंगावर धावून गेले. तसेच त्यांनी बसमधील इतर प्रवाशांना सोडून फिर्यादी यांना डेपोकडे नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान महिलेने नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले. रस्त्यात महिलेच्या नातेवाईकांनी बस अडवून महिलेची सुटका केली. त्यानंतर याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.