पार्थ पवार आता राज्यसभेसाठी उमेदवार ?, मावळ, शिरूर लोकसभेला शाश्वती नसल्याने राष्ट्रवादीची सावध भूमिका

0
222

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – एप्रिलमध्ये रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून सुनील तटकरे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना संधी मिळू शकते. शिवसेनेकडून (शिंदे गट) मिलिंद देवरा, भाजपकडून राम शिंदे यांची वर्णी लागू शकते. कोणत्याही परिस्थितीत पार्थ पवार यांना संसदेत पाठवायचेच असा निग्रह अजितदादांच्या घरातून आहे. मावळ किंवा शिरूर लोकसभा मतदारसंंघातून त्यांनी महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी द्यायची आणि निवडूण आणायचे अशा हालचाली सुरू होत्या, पण दोन्ही ठिकाणी नकारात्मक अहवाल आल्यानंतर आता सुरक्षित म्हणून राज्यसभेवर संधी द्यायचे घाटते आहे.

राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर २९ फेब्रुवारीला निकाल जाहीर होतील. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. सध्या या सहा पैकी तीन जागा सत्ताधारी भाजपच्या ताब्यात असून विरोधकांच्या ‘मविआ’तील घटकपक्षांकडेही तीन जागा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या पक्षांना आपापले गड राखता येतील किंवा नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

मध्यप्रदेश आणि प. बंगालमधील प्रत्येकी पाच जागांसाठी, गुजरात, कर्नाटकमधील चार जागांसाठी मतदान होणार आहे. याशिवाय तेलंगण, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांतील प्रत्येकी तीन जागांसाठी तर छत्तीसगड, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा यंदा रिक्त होत असून यात सत्ताधारी पक्षाचे परराष्ट्रराज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या जागेचा समावेश आहे. काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनिल देसाई यांची मुदत येत्या दोन एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागाही रिक्त होतील.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचे चिरंजीव यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत आहे. २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून ते उमेदवार होते, मात्र शिवसेना भाजप युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा दारुण पराभव केला. पवार कुटुंबातील हा पहिलाच पराभव होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्या पराभवाची सल कायम आहे. पुन्हा याच जागेवर उमेदवारी देऊन पार्थला जिंकूण आणायचे अशी तयारी सुरू होती. दरम्यान, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजप यांच्या जागा वाटपात मावळ शिंदे गटाकडे आणि शिरूर अजित पवार यांच्याकडे आहे. मावळातून दोन वेळा खासदार असलेले श्रीरंग बारणे हेच पुन्हा महायुतीचे उमेदवार असणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे हेच पुन्हा रिंगणात असणार आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा पाडाव करायचा असेल तर तोलामोलाचा उमेदवार म्हणून तीन वेळा येथून खासदारकी केलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याशिवाय सात वेळा आमदार आणि ३० वर्षे मंत्री राहिलेले दिलीप वळसे पाटील तसेच भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचीही नावे स्पर्धेत आहेत. दिग्गजांना सोडून तिथे पार्थ पवार यांना संधी दिलीच तर पुन्हा मावळ लोकसभेसारखा कटू अनुभव येण्याची शक्यता होती. त्यामुळेच मावळ आणि शिरूर लोकसभा उमेदवारी सोडून आता पार्थ पवार यांना थेट राज्यसभेवर पाठविण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे.