बर्न वार्ड महापालिका सभेने जिथे मंजूर केला तिथेच करा – स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांची आयुक्तांकडे मागणी

0
228

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – जळीतग्रस्तांवर उपचारासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने थेरगाव येथे बांधलेल्या रुग्णालयातील एक मजला कायम स्वरुपी करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत यापूर्वीच मंजूर कऱण्यात आला आहे. आता अशाही परिस्थितीत पुन्हा नव्याने याच विषयावर काथ्याकूट सुरू झाला आहे तो प्रथम बंद करा आणि जिथे करण्याचे ठरले आहे तिथेच तो बर्न वार्ड तातडिने करा, अशी आग्रही मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना त्याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी दिले.

आग लागून निष्पाप लोकांचा त्यात मृत्यू झाल्याच्या तीन मोठ्या दुर्घटना गेल्या सहा महिन्यांत या शहरात घडल्या. तळवडे येथील अवैध कारखान्यातील आगीत १४ महिलांचा होरपळून मृत्यू झाला. त्यापूर्वी शाहूनगर येथील हार्डवेअर दुकानाच्या पोटमाळ्यावर झोपलेले चार जणांचे कुटुंब आगीत होरपळून अक्षरशः कोळसा झाल्याचे जनतेने पाहिले. गेल्याच आठवड्यात वाल्हेकरवाडी येथीव लाकडाच्या वखारीला आग लागली आणि शेजारील प्लॅस्टिकच्या दुकानात पोटमाळ्यावर झोपलेले सख्खे भाऊ होरपळून मृत झाले. आजवरच्या या तीन दुर्घटनांनंतर वारंवार बर्न वार्डबद्दल चर्चा झाल्या. विधानसभेतसुध्दा या विषयावर महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यात आला. प्रत्यक्षात बथ्थड प्रशासनाने कागदी घोडे नाचविण्यापलिकडे काहीच केलेले नाही.

मुळात शहरातील आगीच्या घटनांमध्ये भाजलेल्या रुग्णांवर उपचारासाठी ससूनला जावे लागते म्हणून स्वतंत्र बर्न वार्ड व्हावा अशी मागणी नगरसेवकांनी केली होती. महापालिका सभेत त्यावर चर्चा होऊन ती मंजुरही करण्यात आली होती. थेरगाव येथील महापालिका रुग्णालयातच एक मजला बर्न वार्डसाठी करण्याचे महापालिका सभेत ठरले व त्याप्रमाणे बांधकाम नकाशे देखील मंजूर करण्यात आले आहेत. प्रशासनावर तो निर्णय बंधनकारक आहे. खरे तर, त्यासाठी आता पुन्हा नव्याने सगळा आटापीटा करण्याची गरज नाही. थेरगाव रुग्णालयात जिथे बर्न वार्ड करण्याचा ठराव केला आहे तिथेच तो झाला पाहिजे, अशी मागणी सीमा सावळे यांनी निवेदनातून केली आहे.

कोरोनाच्या काळात थेरगाव रुग्णालय कोरोना पेशंटसाठी वापरण्यात आले होते. प्रत्यक्षात जिथे बर्न वार्ड करायचे महापालिका सभेत ठरले त्या मजल्याचे डिझाईनसुध्दा तशाच पध्दतीने करून घेतलेले आहे. बर्न वार्ड साठी आवश्यक सुविधा आणि उपचारांची निकड लढात घेऊनच तो आराखडाही कऱण्यात आला आहे. आता पुन्हा नव्याने सगळे सोपस्कर करण्याची गरज नाही. प्रशासनाने आता कुठली कारणे सांगू नयेत. मूळ मंजुरी घेतली तिथेच बर्न वार्ड तातडिने सुरू करावा, लोकांच्या जीवाशी खेळू नका आणि महापालिका सर्वसाधारण सभेचाही अवमान करून नका, असे सीमा सावळे यांनी या निवेदनात म्हटले आहे.