वंदना द्विवेदीवर झाडल्या पाच गोळ्या; शवविच्छेदन अहवालात प्रकार उघड

0
233

हिंजवडी, दि. २९ (पीसीबी) – हिंजवडी आयटी पार्क परिसरात रविवारी (दि. 28) एका हॉटेलच्या खोलीमध्ये आयटी अभियंता असलेल्या वंदना द्विवेदीचा मृतदेह आढळला. तिच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे. आयटी अभियंता तरुणीवर तब्बल पाच गोळ्या झाडल्या असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ऋषभ निगम (रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वंदना द्विवेदी (वय 26, रा. हिंजवडी. मूळ रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या आयटी अभियंता तरुणीचे नाव आहे. वंदना हिंजवडी परिसरातील एका आयटी कंपनीमध्ये काम करत होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वंदना द्विवेदी आणि ऋषभ निगम हे दोघेही मूळचे लखनऊचे रहिवासी. ते दोघे कॉलेज पासूनचे मित्र होते. मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. दरम्यान वंदना नोकरीच्या निमित्ताने हिंजवडी येथे आली. तर ऋषभ हा लखनऊ येथे रियल इस्टेट कंपनीत ब्रोकरचे काम करत होता.

वंदनाला भेटण्यासाठी ऋषभ 25 जानेवारी रोजी हिंजवडी येथे आला होता. त्याने हिंजवडी परिसरातील एका हॉटेलमध्ये 306 नंबरची खोली बुक केली होती. हॉटेलमध्ये ऋषभ आणि वंदना यांचा 27 जानेवारी रोजी वाद झाला. त्यातून ऋषभ याने वंदनावर तब्बल पाच गोळ्या झाडल्या.

27 जानेवारी रोजी सायंकाळी तो हॉटेलमधून बाहेर पडला. तो मुंबई मार्गे लखनऊला पळून जात असताना नवी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने हिंजवडी येथे खून केला असल्याचे समोर आले. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांशी संपर्क करत खातरजमा केली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी संबंधित हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली असता वंदना द्विवेदी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांना हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी ऋषभ निगम याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी ऋषभ याच्याकडून पिस्तूल जप्त केले आहे. दरम्यान हिंजवडी पोलिसांनी वंदना हिचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. त्यामध्ये वंदना हिच्यावर पाच गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.